सचिन वाझे झाले माफीचा साक्षीदार, जाणून घ्या नेमकं काय झालं
बुधवार, 1 जून 2022 (19:52 IST)
मुंबई हायकोर्टाने बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना माफीचा साक्षीदार होण्यास परवानगी दिली आहे. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांच्या विरोधात एक पत्र लिहिलं होतं. त्यात अनिल देशमुख भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. सचिन वाझेंनीही याच पत्राची री ओढत असा भ्रष्टाचार होत असल्याचं सांगितलं होतं.
सेवेत परत घेण्यासाठीही लाच मागितल्याचा आरोप त्यांनी केला होता. याच संपूर्ण प्रकरणात वाझे यांना माफीचा साक्षीदार केलं आहे.
गेल्या आठवडयात त्यांन ही याचिका केली होती. त्यांनी सीबीआयबरोबर सहकार्य केलं होतं. त्यानंतर त्यांचा जबाब नोंदवला गेला होता. भारतीय दंड संहितेच्या कलम 306 नुसार त्यांना साक्षीदार करण्यात आलं आहे.
सध्या वाझे यांच्यावर 9 खटले सुरू आहेत. माफीचा साक्षीदार असले तरी अन्य प्रकरणात त्यांना तुरुंगातच रहावं लागणार आहे.
त्यांना माहिती असलेल्या सर्व गोष्टी ते कोर्टाला प्रामाणिकपणे सांगतील अशी अट त्यांच्यासमोर ठेवण्यात आली आहे. अनिल देशमुख यांचे सहाय्यक कुंदन शिंदे यांनी या अर्जाला विरोध केला होता.
सचिन वाझेंचा आजवरचा प्रवास कसा होता ते जाणून घेऊ या.
क्राइम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख
महाराष्ट्र पोलीस दलात सचिन वाझे सहाय्यक पोलीस निरीक्षक, म्हणजेच असिस्टंट पोलीस इंनस्पेक्टर (API) पदावर कार्यरत होते.
मुंबई क्राइम ब्रांचच्या 'क्राइम इंटेलिजन्स युनिट' चे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. मुंबईत घडणाऱ्या गुन्हेगारी कारवायांची गोपनीय माहिती मिळवून, त्या रोखण्याचं काम क्राइम ब्रांचच्या या युनिटकडे आहे.
जून 2020 मध्ये मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सचिन वाझेंच निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेतला. निलंबन मागे घेतल्याने तब्बल 16 वर्षांनी वाझे यांचा पुन्हा महाराष्ट्र पोलिसांच्या सेवेत येण्याचा मार्ग खुला झाला.
पोलीस दलात परतल्यानंतर वाझे यांची आयुक्तांनी प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या मुंबई क्राइम ब्रांचमध्ये नियुक्ती केली.
'सचिन हिंदूराव वाझे'
सचिन वाझे यांचं पूर्ण नाव, सचिन हिंदूराव वाझे. सचिन वाझे मुळचे कोल्हापूरचे. सचिन वाझे यांची 1990 मध्ये महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर निवड झाली. तेव्हापासून वाझे यांचा पोलीस दलातील प्रवास सुरू झाला.
वाझे यांना ओळखणारे वरिष्ठ क्राइम रिपोर्टर सांगतात, "पोलीस दलात वाझे यांना पहिली पोस्टिंग मिळाली नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात. त्यानंतर 1992 च्या आसपास त्यांची बदली ठाण्यात झाली."
मुंबईत अंडरवर्ल्डने 1990 च्या दशकात डोकं वर काढण्यास सुरूवात केली. दाऊद, छोटा राजन आणि अरूण गवळी सारखे डॉन मुंबईच्या रस्त्यांवर रक्तपात करत होते. मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडली.
मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्डच्या शार्प शूटर्सचं एक-एक करून एन्काउंटर करण्यास सुरूवात केली होती. सचिन वाझे त्याचसुमारास मुंबईत बदलीवर रुजू झाले होते.
सब इन्स्पेक्टर ते 'एन्काउंटर स्पेशालिस्ट'
वाझे यांची मुंबईत क्राइम ब्रांचमध्ये पोस्टिंग झाली.
सचिन वाझेंची कारकीर्द जवळून पाहणारे पत्रकार नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती देतात की, "मुंबईत पोस्टिंग झाल्यानंतर वाझेंनी एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाणारे प्रदीप शर्मा यांच्या हाताखाली काम केलं. त्यावेळी शर्मा अंधेरी क्राइम इंटेलिजन्स युनिटचे (CIU) प्रमुख होते."
क्राइम ब्रांचमधूनच त्यांचा सबइन्स्पेक्टर ते एन्काउंटर स्पेशालिस्ट असा प्रवास सुरू झाला.
नाव न घेण्याच्या अटीवर ते पुढे सांगतात, "सचिन वाझे यांनी आत्तापर्यंत 60 पेक्षा जास्त अंडरवर्ल्डच्या गुंडांचा एन्काउंटर केला आहे."
मुन्ना नेपालीच्या एन्काउंटरमुळे सचिन वाझे मुंबई पोलीस दलात चर्चेत आल्याचं बोललं जातं.
सचिन वाझे निलंबित होईपर्यंत मुंबई क्राइम ब्रांचमध्ये कार्यरत होते.
ख्वाजा यूनूस प्रकरणी निलंबन
मुंबई अंडरवर्ल्डचा कणा मोडण्यासाठी पोलिसांनी एन्काउंटरचं हत्यार उगारलं होतं. एकीकडे मुंबई पोलीस एन्काउंटरमध्ये अंडरवर्ल्डचा खात्मा करत होते. तर, 2000 च्या सुरूवातीला मुंबईवर दहशतवादाचं सावटं दिसू लागलं.
सचिव वाझे क्राइम ब्रांचमध्ये असताना, डिसेंबर 2002 मध्ये मुंबई पोलीस घाटकोपर स्फोटाची चौकशी करत होते. पोलिसांनी चौकशीसाठी ख्वाजा यूनूसला ताब्यात घेतलं होतं. पण, 2003 मध्ये ख्वाजा पोलीस कोठडीतून फरार झाल्याचा दावा पोलिसांनी केला.
पोलीस कोठडीत चौकशी दरम्यान ख्वाजा यूनूसचा मृत्यू झाल्याचा आरोप मुंबई क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांवर झाला. काही अधिकाऱ्यांवर ख्वाजा मृत्यूप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. सचिन वाझे या अधिकाऱ्यांपैकीच एक होते.
ख्वाजा मृत्यू प्रकरणी मे 2004 मध्ये राज्य सरकारने सचिन वाझेंना पोलीस दलातून निलंबित केलं.
साल 2008 मध्ये सचिन वाझे आणि इतरांवर ख्वाजा मृत्यूप्रकरणी 1000 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं.
पोलीस दलाचा राजीनामा आणि शिवसेना प्रवेश
सचिन वाझे यांनी पोलिस दलातून निलंबित झाल्यानंतर तीन वर्षांनी 2007 मध्ये महाराष्ट्र पोलीस दलाचा राजीनामा दिला. पण, सरकारने त्यांचा राजीनामा मंजूर केला नाही.
राजीनामा दिल्यानंतर एका वर्षात सचिन वाझे यांनी 2008 मध्ये दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत दसरा मेळाव्यात शिवसेनेत प्रवेश केला.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सचिन वाझे राजकारणात फारसे सक्रीय नव्हते, असं शिवसेना नेते सांगतात.
पण, काही वृत्तवाहिन्यांच्या कार्यक्रमाला सचिन वाझे यांनी शिवसेना प्रवक्ते म्हणून हजेरी लावली असल्याची चर्चा आहे.
मुंबई पोलिसांचा 'टेक्नो-सॅव्ही' अधिकारी
सचिन वाझे पोलीस दलात असताना क्राइम रिपोर्टिंग करणारे पत्रकार सांगतात, "सचिन वाझेंची मुंबई पोलीस दलात 'टेक्नो-सॅव्ही' अधिकारी म्हणून ओळख होती. मुंबईत सायबरक्राइम करणाऱ्यांवर कारवाई पहिल्यांदा सचिन वाझे यांनीच केली होती."
वाझे यांनी 1997 मध्ये एक आंतरराष्ट्रीय क्रेडीटकार्ड रॅकेट उघडकीस आणलं होतं. त्यानंतर त्यांना त्यांचे सहकारी 'टेक्नो-सॅव्ही' अधिकारी म्हणून ओखळू लागले.
अर्णब गोस्वामींची अटक
शिवसेनेत असल्याकारणाने सचिन वाझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत निकटवर्तीय आणि जवळचे मानले जातात.
अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी रिपब्लिक चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना काही महिन्यांपूर्वी रायगड पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी मुंबई पोलिसांकडून सचिन वाझे त्या टीमचं नेतृत्व करत होते.
अर्णब गोस्वामी यांच्या कतिथ TRP घोटाळ्याची चौकशी देखील सचिन वाझे यांच्याकडेच आहे.
पुस्तकाचं लेखन
सचिव वाझे यांनी मुंबईत 26/11 ला करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यावर 'जिंकून हरलेली लढाई' नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे.