संजय बियाणी हत्या प्रकरण

बुधवार, 1 जून 2022 (15:43 IST)
नांदेड : बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येचा उलगडा करण्यात नांदेड पोलिसांना यश आले आहे. (Nanded) याबाबतची माहिती विशेष पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी व पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी बुधवारी पञकार परिषदेत दिली.सदर प्रकरणात विमानतळ पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Marathwada) सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या आदेशान्वये एसटीआयची स्थापना करण्यात आली होती.
 
याचे प्रमुख भोकरचे सहाय्यक पोलिस अधिक्षक विजय कबाडे व त्यांच्या मदतीला अतिरिक्त पोलिस अधिक्षक निलेश मोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने, डी डी भारती, संतोष शेकडे शिवसांब घेवारे, चंद्रकांत पवार, दशरथ खाडे, गंगाप्रसाद दळवी, पोलीस उपनिरीक्षक सचिन सोनवणे, बोराटे, दत्तात्रय काळे गणेश घोडके आदींनी तपास केला.
 
सदर गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा, पोलिस ठाणे यांच्यामार्फत ५६ दिवसांपासून तपास करणे चालू होते. सदर गुन्ह्याबाबत महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, तेलंगणा व कर्नाटक या राज्यात जाऊन तपास करण्यात आला. तपासादरम्यान आत्तापर्यंत सहा आरोपी निष्पन्न झाले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. या नंतरही तपासात आणखी काही धागेदोरे मिळतील अशी दाट शक्यता पोलिसांना आहे.
 
सगळे आरोपी नांदेडचेच..
 
अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये इन्‍द्रपालसिंह उर्फ सनी सिंग मेजर (वय ३५) मुक्तेश्वर उर्फ गोलू विजय मंगनाळे (वय २५) सतनाम सिंग उर्फ दलबिर सिंह शेरगिल (वय २८) हरदीपसिंग उर्फ सोनू पिनिपाना सतनाम सिंग बाजवा(वय ३५) गुरूमुखसिंग उर्फ गुरी सेवकसिंग गील (वय २४) आणि करणजितसिंग रघबिरसिंग साहू (वय ३०, सर्व राहणार नांदेड) यांना अटक करण्यात आली आहे.
 
दरम्यान, या घटनेचा फायदा घेऊन खंडणी वसुलीसाठी काही गुन्हेगारांनी प्रयत्न केले त्यांच्याविरुद्ध स्वतंत्रपणे पोलीस ठाणे भाग्यनगर आणि विमानतळ येथे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. यानंतरही कोणाला खंडणीसाठी मागणी होत असल्यास त्यांनी नांदेडचे पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन निसार तांबोळी यांनी केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती