“करोना काळात राज्यात हलगर्जीपणा, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा..” राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोलाखारघर या ठिकाणी १६ एप्रिलला डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमात २० लाखांहून अधिक लोक उपस्थित होते. या कार्यक्रमात आलेल्या श्री साधकांचे उष्माघातामुळे हाल झाले. १४ लोकांचा या प्रकरणात मृत्यू झाला. यानंतर आता यावरून राजकारण रंगलं आहे. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. त्या मागणीबाबत विचारलं असता करोना काळात हलगर्जीपणा झाला आहे असा टोला राज ठाकरेंनी लगावला आहे.
राज ठाकरे यांनी काय म्हटलं ?
“करोनाच्या काळातही अनेक प्रकारचा हलगर्जीपणा झाला आहे. तिथेही अनेक प्रकरणांमध्ये आपल्याला सदोष मनुष्यवधाचा खटला आजही दाखल करता येऊ शकतो.याचं राजकारण करायला नको. सकाळची वेळ निवडायला नको होती. अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा सत्कार आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना द्यायला हवा होता. अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा पुरस्कार मिळाला आहे ही आनंदाची बाब आहे. मात्र जे घडलं तो अपघात आहे. अपघाताचं राजकारण कुणीही करू नये.” असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.