राज्यात पावसाला सुरुवात ,या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा

सोमवार, 20 जून 2022 (16:28 IST)
राज्यात मान्सूनचं आगमन झालं आहे. सकाळपासून मुंबई, ठाणे, पालघर कोकणातील काही भागात हलका ते मध्यम पावसाची सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस नसल्यानं शेतकरी काळजीत आहे. शेतकऱ्यांनी खरीपच्या पेरणीची तयारी सुरु केली असून शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. 
राज्यात ठाणे, मुंबई, पालघर अंधेरी, चर्चगेट, खार येथे पावसाने हजेरी लावली असून वातावरण गार झालं आहे. त्यामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे .
 
महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. येत्या काही तासात राज्यातील विविध ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत.
 
कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात यलो अलर्ट सांगण्यात आला आहे. हवामान खात्यानं गडचिरोली वगळता सर्व जिल्ह्यात कमी अधिक पावसाची शक्यता वर्तवली आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, रायगड, अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक, ठाणे, मुंबई, नागपूर, नंदुरबार आणि पालघर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात हवामान खात्यानं मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यात पावसाचा जोर वाढेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती