मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील 'या' नेत्यांना संधी, पाहा यादी

रविवार, 9 जून 2024 (14:26 IST)
नरेंद्र मोदी आज (9 जून) भारताचे पंतप्रधान म्हणून सलग तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वातल्या एनडीए आघाडीला 292 जागा मिळाल्या असून आज संध्याकाळी नवीन सरकारचा शपथविधी होणार आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात यावेळी महाराष्ट्रातून कोण कोण असेल याची उत्सुकता सगळ्यांना आहे.
 
महाराष्ट्रातील 'या' नेत्यांना मोदी सरकारमध्ये संधी
नितीन गडकरी - 2014 आणि 2019 च्या दोन्ही मंत्रिमंडळात नितीन गडकरी सहभागी होते. रस्ते वाहतूक मंत्रालय त्यांच्याकडे होतं. या नव्या मंत्रिमंडळातही त्यांना संधी मिळाली आहे.
 
पियुष गोयल - 2014 आणि 2019 या दोन्ही मंत्रिमंडळात पियुष गोयल केंद्रीय मंत्री होते. रेल्वे मंत्रालयासारखं मोठं मंत्रालय त्यांनी सांभाळलं आहे. मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळातही पियुष गोयल यांना संधी मिळाली आहे. यापूर्वी राज्यसभेतून संसदेत पोहोचणारे गोयल यंदा उत्तर मुंबई लोकसभा मतदारंसघातून विजयी होऊन संसदेत पोहोचले आहेत.
 
प्रतापराव जाधव - एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांची मोदी सरकारमध्ये वर्णी लागली आहे. त्यांना कॅबिनेट मिळेल की राज्यमंत्रिपद हे अद्याप स्पष्ट नाही.
 
रक्षा खडसे - रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांना मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. रक्ष खडसे या माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या सून आहे.
 
रामदास आठवले - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे अध्यक्ष रामदास आठवले यांचीही नव्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. आठवले यापूर्वीच्या दोन्ही मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री होते.
 
मुरळीधर मोहोळ - पुण्याचे पहिल्यांदाच खासदार बनलेले मुरळीधर मोहोळ यांनाही मोदींच्या मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांचा पराभव करून ते संसदेत पोहोचले आहेत.
मोदींच्या मावळत्या मंत्रिमंडळात भारती पवार (आरोग्य राज्यमंत्री), रावसाहेब दानवे (रेल्वे राज्यमंत्री) आणि कपिल पाटील (पंचायत राज राज्यमंत्री) होते. मात्र, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत या तिन्ही केंद्रीय मंत्र्यांचा पराभव झाला. त्यामुळे आता मोदींच्या मंत्रिमंडळात नवीन चेहरे कोण असतील यावरून माध्यमं आणि राजकीय विश्लेषकांमध्ये चर्चा रंगली आहे.
 
राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग असणारा एकनाथ शिंदे यांच्या गटाचे सात खासदार निवडून आले आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच खासदार निवडून आला असला तरी या पक्षाचे राज्यसभा खासदारही आहेत. त्यामुळे आता मोदींच्या नवीन मंत्रमंडळात कुणाची वर्णी लागते ही पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
 
2019च्या निवडणुकीत भाजपचे 23 खासदार संसदेत गेले होते यावेळी मात्र महाराष्ट्रात भाजपची चांगलीच पीछेहाट झाली असून राज्यात भाजपचे नऊ खासदार यावेळी निवडून आले आहेत.
 
शिंदे गटाकडून श्रीकांत शिंदे, प्रतापराव जाधव, श्रीरंग बारणे तर अजित पवार गटाकडून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावांची भावी मंत्री म्हणून चर्चा सुरु आहे. भाजपच्या विद्यमान मंत्र्यांचा पराभव झालेला भाजपकडून नवीन मंत्रमंडळात कुणाला संधी दिली जाते? यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचा विचार केला जातो का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे.
 
Published By- Priya Dixit
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती