'मला मोकळं करा...' च्या विनंतीवर अमित शाह काय म्हणाले? देवेंद्र फडणवीसांनीच सांगितलं

शनिवार, 8 जून 2024 (20:44 IST)
लोकसभा निवडणुकीतील अपयशाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी घेत उपमुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी दाखवली होती. मला मोकळं करा, अशी विनंती त्यांनी केली होती. पण ते वक्तव्य निराशेतून केलं नव्हतं, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं. तसंच याबाबत अमित शाहांशी बोलल्याचंही त्यांनी सांगितलं.
 
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या विधिमंडळ गटाची बैठक झाली, त्यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. निवडणुकीतील अपयशाचं पुनरावलोकन या बैठकीत करण्यात आल्याचं फडणवीस म्हणाले.
 
"या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व मी करत होतो, त्यामुळं या अपयशाची जबाबदारी माझी असल्याचं मी सांगितलं. म्हणून मला मोकळं करून काम करायची संधी द्या, असं म्हणालो होतो. पण मी ते निराशेतून बोललो नाही", असं फडणवीस म्हणाले.
 
"मी पळणारा व्यक्ती नाही, तर लढणारा व्यक्ती आहे. छत्रपती शिवराय आमची प्रेरणा आहे. त्यामुळं मी निराश झालो असं वाटलं असेल तर ते चुकीचं आहे," असंही त्यांनी म्हटलं.
 
शाह म्हणाले-आधी हे सगळं चालू द्या..
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना त्यांच्या 'मोकळं करा'संदर्भातील वक्तव्यामागची पार्श्वभूमी आणि याबाबत अमित शाहांशी झालेल्या भेटीबाबतही सांगितलं.
 
"माझ्या मनात काही स्ट्रॅटर्जी होती आणि ती आजही आहे. मी अमित शाहा यांना भेटून त्यांना माझ्या डोक्यात काय आहे हे सांगितलं. त्यांनी म्हटलं की, आधी हे सगळं चालू द्या नंतर आपण काय महाराष्ट्राची ब्लू प्रिंट तयार करयाची ती करू," असं फडणवीस यावेळी म्हणाले.
 
त्यामुळं आता मी काम करत आहे आणि करणारच आहे, असंही त्यांनी सांगितलं. त्यांनी यावेळी महायुतीच्या पराभवाची कारणमीमांसाही केली.
 
 
"महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 43.9 टक्के आणि महायुतीला 43.6 टक्के मते मिळाली. त्यांना 2 कोटी 50 लाख आणि महायुतीला 2 कोटी 48 लाख मते मिळाली आहेत. एवढाच फरक आहे, पण त्यामुळं जागांचा मोठा फरक पडला," असं ते म्हणाले.
 
ते म्हणाले की, मराठवाड्यात मराठा समाजानं नरेटिव्ह तयार केला. मराठा समाजाला दोन्ही वेळा आपण आरक्षण दिलं. त्यांना सगळं आपण दिलं. उलट ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांच्या पारड्यात मतं गेली.
 
फडणवीसांनी यावेशी उद्धव ठाकरेंवरही टीका केली. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मराठी मते मिळाली नाही ठरावीक समाजाच्या मतांवर मुंबईत त्यांचे उमेदवार निवडून आले. इतर ठिकाणी मतदारांनी त्यांना हद्दपार केलं, असं फडणवीस म्हणाले.
 
काय म्हणाले होते फडणवीस?
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपच्या खराब कामगिरीच्या पार्शभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद सोडण्याची तयारी दर्शवली होती.
 
येत्या निवडणुकीसाठी नेतृत्वाने मला सरकारमधून मोकळं करावं आणि माझ्या कामावर लक्ष केंद्रित करण्याची संधी द्यावी असं देवेंद्र म्हणाले होते.
 
ते म्हणाले, "मला विधानसभा निवडणुकीच्या तयारीवर पूर्ण लक्ष केंद्रित करायचे आहे. त्यामुळे मला मंत्रिमंडळाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती मी पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाला करणार आहे."
 
ते म्हणाले, "ज्याप्रकारे महाराष्ट्रात जागा मिळतील असं वाटलं होतं ते झालं. नाही त्यामागे काही कारणं आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला स्वीकारलं आणि आम्हाला नाकारलं हे नॅरेटिव्ह चुकीचं आहे. लोकांना समान मतं दिली आहेत. कुठेही आम्हाला नाकारलं असं झालेलं नाही.
 
“आम्हाला फक्त 2 लाख मतं कमी पडली आहेत. मात्र यात जागेचं अंतर जास्त असल्यामुळे मविआला 30 आणि आम्हाला 17 जागा मिळाल्या आहे. मुंबईत मविआला 4 आणि आम्हाला 2 जागा मिळाल्या. मुंबईत मविआपेक्षा आम्हाला 2 लाख मतं जास्त आहेत.
 
शेतीबाबत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात उशीर झाल्यानेही पक्षाला फटका बसल्याचं फडणवीस म्हणाले. केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला. तो लवकर माघारी घेतला नाही. याशिवाय सोयाबीन आणि कापूस पिकांचे बाजारभाव ठरवण्यात उशीर झाल्याचं त्यांनी म्हटलं.
 
नरेंद्र मोदी यांनी महाष्ट्रात झंजावती प्रचार केला होता. पण त्यांनी ज्या ठिकाणी सभा घेतल्या तिथल्या अनेक ठिकाणी पण भाजपला यश मिळालं नाही. उदाहरणार्थ माढा आणि सोलापूरमध्ये मोदी यांनी दोन दिवस तळ ठोकला होता.
 
सध्या राज्यात लोकसभेतील खासदारांच्या आकडेवारीनुसार सर्वात मोठा पक्ष बनला आहे. काँग्रेसने 13 जागांवर यश मिळवलं आहे.
 
रावसाहेब दानवे, भारती पवार यांच्यासारखे केंद्रीय मंत्री आणि राज्यातील कॅबिनेटमंत्री सुधीर मंनगंटीवार यांच्यासारख्या नेत्यांना यंदा पराभव स्वीकारावा लागला आहे.
 
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राकडे संपूर्ण देशाचं ज्या उत्सुकतेनं लक्ष लागलं होतं, त्या उत्सुकतेला महाराष्ट्रानं निराश केलं नाही.
 
कारण अगदी शेवटच्या क्षणापर्यंत महाराष्ट्रातल्या अनेक लढती अगदी चुरशीच्या ठरल्या.
 
मात्र, अखेरीस महाराष्ट्रातल्या 48 पैकी जास्तीत जास्त जागांवर महाविकास आघाडीनेच बाजी मारली. बीडमधील निकाल जाहीर होण्यासाठी रात्री उशीर झाला. पण त्यानंतर महाराष्ट्रातील 48 जागांचं जय-पराजयाचं चित्रही स्पष्ट झालं.
 
महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच प्रामुख्यानं लढत झालेल्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 30 जागा, तर महायुतीला 17 जागा मिळाल्या.
 
सांगलीतील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्या विजयानं अपक्ष उमेदवाराला एक जागा मिळाली.
 
ही सामूहिक जबाबदारी - एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र आम्ही भविष्यातही एकत्र काम करणार असल्याचं म्हटलं आहे.
 
निवडणुकीत हारजित होत असते. एका निवडणुकीमुळे आम्ही खचणार नाही. एकत्र टीम म्हणून भविष्यातही काम करणार असल्याचं शिंदे म्हणाले
 
"आम्ही एकत्र काम केलं आहे. त्यामुळे सध्याच्या कामगिरीची जबाबदारी ही सामुहिक आहे. आमच्या एकूण जागा जरी कमी झाल्या असल्या तरी राज्यातील मतांची टक्केवारी जास्त आहे," असं एकनाथ शिंदे यांनी टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया दिली.
 
कॅबिनेट मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी माध्यमांना म्हटले आहे की फडणवीसांनी राजीनामा देऊ नये, सरकार स्थिर राहण्यासाठी त्यांनी मंत्रिमंडळात राहणे आवश्यक आहे.
 
भाजपचे 28 पैकी 19 उमेदवार पराभूत
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या निकालानं सत्ताधारी महायुती आणि विशेषतः भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपनं लोकसभेसाठी 45 जागांचं उद्दिष्ट ठेवलं होतं.
 
पण 48 जागांपैकी महाराष्ट्रात महायुतीला फक्त 17 जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीला 30 जागा मिळाल्या. एक जागा काँग्रेस बंडखोर विशाल पाटील यांना मिळाली आहे.
 
महायुतीमध्येही भाजपनं सर्वाधिक 28 ठिकाणी उमेदवार उतरवले होते. पण त्यांचे फक्त 9 उमेदवार विजयी झाले. म्हणजे भाजपच्या चिन्हावर लढणाऱ्या तब्बल 19 उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला.
 
विशेष म्हणजे भाजपच्या पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटिवार, भारती पवार, सुभाष भामरे अशा बड्या नेत्यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. तर त्यांच्याबरोबरच्या शिंदे गटानं मात्र 15 पैकी 7 जागी विजय मिळवल्याचं दिसून आलं.
 
त्यामुळं एकूणच या निवडणुकीत भाजपच्या कामगिरीवर प्रचंड परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं होतं. 2019 च्या कामगिरीशी तुलना करता यावेळी भाजपची कामगिरी कमालीची घसरल्याचं पाहायला मिळालं.

Published By- Priya Dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती