नाशिक : बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये अधिक मासानिमित्त त्र्यंबकेश्वरच्या महादेव मंदिरात भाविकांची तोबा गर्दी झाली आहे. त्यातच व्हीआयपी दर्शनामुळे सामान्य भाविकांना रांगेत तासंतास उभे रहावे लागत होते. भाविकांची ही अडचण हेरून त्र्यंबक देवस्थान ट्रस्टने शनिवारपासून येत्या 15 सप्टेंबरपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरातील व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयातून केंद्र व राज्य पातळीवरील राजशिष्टाचार म्हणून येणाऱ्या व्हीआयपी पाहुण्यांना वगळण्यात आले आहे.
त्र्यंबकेश्वर हे एक आद्य ज्योतिर्लिंग आहे. त्यामुळे येथे देश-विदेशातील भाविकांची गर्दी असते. त्यातच यंदा अधिक मास आल्यामुळे भाविकांच्या गर्दीत वाढ झाली आहे. आगामी सार्वजनिक सुट्ट्या आणि निज श्रावणानिमित्त ही गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंदिर व्यवस्थापनाने 12 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षांनी या निर्णयासंबंधीचे एक पत्र नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना सोपवले. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी त्र्यंबकेश्वर तहसीलदार श्वेता संचेती व मुख्याधिकारी डॉ. श्रिया देवचके यांच्या आदेशाद्वारे येणाऱ्या पाहुण्यांना व्हीआयपी दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.