मनसेकडून एफएम रेडिओ वाहिन्यांना इशारा

मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019 (08:28 IST)
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करू द्यायचे नाही, अशी मागणी जोर धरू लागली आहे. आता मनसेनं एफएम रेडिओ वाहिन्यांनादेखील इशारा दिला आहे. ''पाकिस्तानच्या आश्रयाने फोफावलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केलेल्या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झालेत. भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका कधी उडेल, काही सांगता येत नाही. अशा स्फोटक वातावरणात आपल्या रेडिओ वाहिन्या मात्र नुसरत फतेह अली खान, राहत फतेह अली खान, आतिफ अस्लम, अली झफर, सज्जाद अली, गुलाम अली, रेश्मा, सफाकत अमानत अली यांसारख्या पाकिस्तानी गायक-संगीतकारांची गाणी भारतीयांना ऐकवतायत. सिनेमा असो की यू ट्युब किंवा अगदी रेडिओ वाहिन्या, दरवेळी काय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेच पाकिस्तानी कलाकारांना विरोध करायचा? या रेडिओ वाहिन्यांमध्ये जे लोक काम करतात किंवा इथल्या कार्यक्रमांचं शेड्यूल जे आखतात, त्यांना देशवासीयांची भावना काय आहे, याची काहीच जाणीव नाही का ? मनसे जोपर्यंत विरोध करणार नाही तोपर्यंत पाकिस्तानचं तुणतुणं वाजतच राहणार का ?” अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी एफएम रेडिओ वाहिन्यांना रोखठोक इशारा दिला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती