कोल्हापूरमधील कणेरी मठमध्ये एका कार्यक्रमादरम्यान घडला प्रकार
कोल्हापूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलं आहे. कोल्हापूरमधील कणेरी मठावर गेल्या काही दिवसांपासून लोकोत्सव सुरु आहे. याठिकाणी मोठी गोशाळा असून यामध्ये हजारो गायी आहेत. या लोकोत्सवासाठी आलेल्या लोकांनी टाकलेले शिळे अन्न खाऊन या गोशाळेतील अनेक गायींचा मृत्यू झाला असून काही गायींवर उपचारदेखील सुरु आहेत. प्राथमिक माहितीनुसार, यामध्ये ५० हुन अधिक गायींचा मृत्यू झाला असून २०हुन अधिक गायींवर उपचार सुरु आहेत. या जनावरांना शिळ्या अन्नातून विषबाधा झाल्याने हा प्रकार घडला.
कोल्हापूरमध्ये कणेरी मठ येथे पंचमहाभूत महामंगल सोहळा सुरू आहे. अशातच ही घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या लोकोत्सवाचे उद्घाटन झाले होते. श्री सिद्धगिरी मठावर आयोजित सुमंगल सोहळ्यात देशी प्रजातींच्या गाय, म्हैस, बकरी, अश्व, गाढव, कुत्रे व मांजर यांचे अनोखे प्रदर्शन भरविण्यात आले होते. मठावर होणाऱ्या सुमंगल सोहळ्यांतर्गत २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान हे प्रदर्शन होईल, अशी माहिती मठाधिपती श्री काडसिद्धेश्वर स्वामी यांनी दिली.