कोल्हापुरात सगळीकडे पाणीच पाणी आहे. पुणे-बेंगलुरू राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आलीय.
सांगली-कोल्हापूर बायपास रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे, तर पन्हाळा रस्ता खचून वाहून गेल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद केली आहे.पंचगंगा नदीची पातळी 53 फुटांवर गेली आहे.यमगर्णी आणि निपाणीमध्ये रस्त्यावर पाणी आल्याने पुणे बेंगलुरू हायवे बंद झाला आहे. पुणे- बेंगलुरू हायवे वाहतुकीसाठी बंद केल्याने वाहनं रस्त्यावरच थांबली आहेत.बॅरिकेड्स लावून पोलिसांनी हे रस्ते बंद केले आहेत. कोल्हापुरात अजूनही पाऊस सुरू आहे.
NDRF च्या दोन टीम्स कोल्हापूरमध्ये दाखल झालेल्या आहेत.
एक टीम करवीर तालुक्यात प्रयागचिखली आणि आंबेवाडीमध्ये आहे. तर दुसरी टीम शिरोळ तालुक्यात आहे.
गारगोटीकडून गडहिंग्लजकडे जाणाऱ्या मार्गावरील पालघाट या ठिकाणी अतिवृष्टीमुळे दरडी कोसळल्या आहेत.
तसंच, पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे दगड-धोंडे, खडक घाटातील रस्त्यावर आल्याने रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झालेला आहे.डोंगरातील पाण्याचे मोठे लोंढे घाटातील रस्त्यावर आडवे वाहत आहेत.गारगोटी -कोल्हापूर, गारगोटी-गडहिंग्लज, गारगोटी -कडगाव हे सर्व मार्ग बंद झाले. गारगोटीचा कोल्हापूर जिल्ह्यातील इतर भागाशी संपर्क खंडित झाला आहे.कोल्हापूर महामार्ग बंद झाल्याने याचा परिणाम दूध पुरवठ्यावर होण्याची शक्यता आहे.
या गावांशी संपर्क तुटला
कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग
कोयना धरणामधून आज (23 जुलै 2021) सकाळी 8 वाजता सांडव्यावरुन 9567 क्युसेक्स विसर्ग (2 फूट) आणि पायथा विद्युत गृहातून 2100 क्युसेक्स असा एकूण 11,667 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
तर सकाळी 10 वाजता विसर्ग वाढवून 50,000 क्युसेक(5 फुट) इतका करण्यात आला.खोडशी बंधाऱ्यातून 15,625 क्युसेक्स तर वारुंजीमधून एकूण 79,599 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय.राजाराम बंधाऱ्यातून 71170 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात झालाय.एकूण 116 बंधारे पाण्याखाली आहेत.