मी त्यांना विधानसभा अध्यक्ष मानत नाही : संजय राऊत

गुरूवार, 23 नोव्हेंबर 2023 (22:00 IST)
नाशिक :विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासोर आमदार अपत्रातेची सुनावणी सुरू आहे.यावर  शिवसेना उद्धव  ठाकरे नेते, खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना टीका केली आहे. ते म्हणाले त्यांना सातत्याने दिल्लीला जावे लागणार. कारण दिल्लीतून निर्णय काय द्यायचा याचा आदेश घेऊन ते सुनावणी करतील. संविधानानुसार सर्वकाही पार पडले असते तर सर्व आमदार आतापर्यंत घरी बसले असते ऐसे सांगितले.
 
नार्वेकर न्याय देऊ शकतील का? यावर राहुल नार्वेकर टिब्यूनल असून मी त्यांना विधानसभा अध्यक्ष मानत नाही, असे खासदार राऊत म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांकडे ट्रिब्युनलची जबाबदारी दिली आहे. सुनावणी घ्या आणि निर्णय द्या. यालाच ट्रिब्युनल म्हणतात. विधानसभा अध्यक्षांचा आम्ही नेहमीच आदर करत आलो आहोत. पण जो व्यक्ती पदावर बसला आहे तो आदरास पात्र आहे का? कायदा आणि संविधानाचा आदर करतो का? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
 
संविधानाच्या दहाव्या परिशिष्टात स्पष्ट सांगितले आहे की फुटीला कोणताही आधार नाही. हा कायदा स्पष्ट सांगतो की पक्ष सोडून गेलेल्यांना अपात्र करायला हवे. आता 1 वर्ष झाले. तारीख पे तारीख सुरू आहे. हा कायदा, हे संविधान आहे का? कोण विश्वास ठेवणार तुमच्यावर? तुम्ही संविधानाच्या चिंधड्या उडवत आहात, अशा शब्दात संजय राऊत यांनी फटकारले.
 
यावेळी किरीट सोमय्या यांनी केलेल्या कोरोना काळात मुंबईत झालेल्या कथित घोटाळ्यांच्या आरोपांनाही राऊत यांनी उत्तर दिले. राऊत म्हणाले, ते बहुतेक उत्तर प्रदेश सरकारबाबत बोलले असावे. कोरोना काळात तिथे ऑक्सिजन पुरवठा झाला नाही, प्रेतांचा खच पडला, गंगेत प्रेतं वाहून गेली. गुजरातमध्ये स्मशानात जागी नव्हती. मध्य प्रदेशमध्ये जे मृत आहेत त्यांच्यावर उपचार केल्याचे दाखवून कोट्यवधींचा घोटाळा झाला. किरीट सोमय्या यांना तेच सांगायचे असावे, पण चुकून त्यांनी मुंबईचा उल्लेख केला. कोरोना काळात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईसह महाराष्ट्राला वाचवण्यात आले. तुम्ही याबाबत जनमत घ्या. देश त्यावेळी कसा तडफडत होता आणि मुंबईसह महाराष्ट्रात उद्धव ठाकरे काय करत होते हे संपूर्ण देशाने, जगाने, डब्ल्यूएचओने पाहिले, असेही राऊत म्हणाले.
 
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी इगतपुरीमध्ये मोठी सभा घेत छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला. भुजबळ हे भविष्यात भाजपमध्ये प्रवेश करतील असा दावा त्यांनी आपल्या इगतपुरीत केला होता. त्यासंदर्भात विचारले असता संजय राऊत यांनी देखील त्यांच्या विधानाला दुजोरा दिला आहे.
 
‘माझ्या पक्क्या माहितीनुसार अजित पवार गटाचे बहुतेक आमदार आणि खासदार, तसेच शिंदे गटाचे बहुतेक सर्व आमदार आणि खासदार हे भविष्यात भाजपत प्रवेश करतील. जर भाजपनं त्यांना उमेदवारी दिली तर ते कमळ चिन्हावर निवडणुका लढवतील’, असा दावा  राऊत  यानी केला.
 
‘धनुष्यबाण मिंधे गटाला मिळाला असला तरी आता धनुष्यबाण चिन्हावर त्यांना कुणी मतदान करणार नाही’, असं स्पष्ट मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. तसंच अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह मिळालं तरी शरद पवार जिथे आहेत तिथेच मतदान होईल. त्याच्यामुळे यांना कमळाबाईला स्वीकारून, त्यांच्या पदराखाली निवडणुका लढवाव्या लागतील. त्यामुळे जरांगे पाटील म्हणतात त्यात तथ्य आहे, असं संजय राऊत म्हणाले.
 
‘ज्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना सोडलेलं आहे ते बहुतेक सगळेच लोकं पराभूत होतील. गद्दारांना स्वीकारण्याची महाराष्ट्रातील जनतेची मानसकिता नाही’, असं राऊत यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती