बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर शिंदे-ठाकरे गटात घोषणाबाजी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले...
शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2023 (07:24 IST)
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 17 नोहेंबरला अकरावा स्मृतिदिन आहे. दरवर्षी हजारो शिवसैनिक दादर शिवाजी पार्कवर असलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी येतात.
16 नोहेंबरला संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी दादरला पोहोचले. त्यावेळी शिंदे गटाचे अनेक कार्यकर्ते आणि नेतेही उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर अभिवादन केले. मुख्यमंत्री तिथून बाहेर पडल्यानंतर तिथे ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली.
यावेळी ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि अनिल देसाई स्मृतिस्थळावर उपस्थित होते. त्याचबरोबर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के, शितल म्हात्रे हे देखील उपस्थित होते.
दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये बराच वेळ घोषणाबाजी सुरू होती. यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाच्या बाजूला असलेला रॅक तुटला.
या सगळ्या प्रकाराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना निषेध व्यक्त केला.
ते म्हणाले, "बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सामंजस्याची भूमिका घेऊन स्मृतिदिनाच्या एक दिवस आधी स्मृतिस्थळावर जाऊन बाळासाहेबांना अभिवादन करतो. मात्र त्यांच्या स्मृतिदिनाला गोंधळ घालून गालबोट लावण्याचा केलेला प्रयत्न हा निंदनीय असून त्याचा करावा तेवढा निषेध कमीच आहे.
राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. खरंतर मुख्यमंत्री असल्यामुळे प्रत्यक्ष स्मृतिदिनी जाऊन अभिवादन केले तरीही आपल्याला कुणी अडवू शकणार नाही. मात्र तरीही तसे करणे आपण टाळले कारण यादिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये अशीच माझी इच्छा होती.
दरवर्षीप्रमाणे बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी स्मृतिस्थळावर जाऊन मी दर्शन घेईपर्यंत तिथे कुणीही आले नव्हते, मात्र मी निघाल्यावर तिथे उबाठा गटाचे नेते अनिल देसाई आणि अनिल परब तिथे आले आणि आमच्या विरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली. तसेच महिला-भगिनींबद्दल अपशब्द वापरले."
या सगळ्या प्रकाराचा दोष ठाकरे गटाच्या नेत्यांना दिला जात आहे. अनिल देसाईंच्या नेतृत्वात कार्यकर्ते दाखल झाले आणि त्यांनी अशांतता पसरवण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप शिंदे गटाकडून करण्यात येत आहे.
पण ठाकरे गटाकडून मात्र शिंदे गटाने अशांतता पसरवल्याचा आरोप केला आहे. ठाकरे गटाचे नेते आणि खासदार अनिल देसाई यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं, "आमच्यासाठी बाळासाहेबांचा स्मृतिदिन अत्यंत महत्वाचा दिवस आहे. शांततेने श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही इथे येत असतो. बाकीचे तमाशे करण्याच्या प्रयत्नात आहेत. कुणी स्मृतिदिनी विघ्न आणण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ते विघ्न येऊ देणार नाही. त्यांचं झालं आहे ना आता त्यांना निघू द्या. ज्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार माहिती आहेत, ते कुणीही इथे अनर्थ करणार नाहीत."
आज 17 नोहेंबरला उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब दादर शिवाजी पार्कवर स्मृतिस्थळावर येतं. या प्रकाराबाबत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.