तौकते चक्रीवादळ कसं पुढं सरकत आहे?

रविवार, 16 मे 2021 (10:57 IST)
भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर तौकते चक्रीवादळ घोंगावत आहे. हे वादळ गुजरातच्या दिशेने मार्गक्रमण करत असून 18 मेच्या पहाटे गुजरातच्या पोरबंदर जवळून हे वादळ जाण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
 
हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी ट्वीट करून यांची माहिती दिली आहे.
तौकते चक्रीवादळ गोव्याच्या किनारपट्टीपासून नैऋत्य दिशेला 300 किमीपेक्षा कमी अंतरावर आहे. आज (16 मे) गोव्यापासून साधारण 280 किमी अंतरावरून ते उत्तरेकडे सरकणार असल्याचा अंदाज आहे. गोव्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
गोवा, रत्नागिरी, सिंधुदुर्गात याचा सर्वाधिक प्रभाव दिसू शकतो. परिणामी दक्षिण कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
 
दरम्यान रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार असल्याने प्रशासनाने सज्ज राहावे व मनुष्यबळ तसेच साधन सामुग्री तयार ठेवावी असं पालकमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
उदय सामंत यांनी आज (16 मे) पहाटे यासंदर्भात आढावा बैठक घेतली. यावेळी सर्व अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचं ते म्हणाले.
"तौकते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आज पहाटे जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे आढावा बैठक संपन्न. सर्व अधिकारी नियंत्रण कक्षात असून वादळाच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. या स्थितीचा कोविड केंद्रांवर कसलाही परिणाम होऊ नये, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनास दिल्या," अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.
 
मुंबई,ठाण्यातही पावसाचा इशारा
उत्तर कोकण म्हणजेच रायगड मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना 16 आणि 17 तारखांना मध्यम किंवा एखाद-दुसऱ्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस असेल. पण वाऱ्याचा वेग ताशी 60 ते 70 किलोमीटर असण्याची शक्यता आहे असं प्रादेशिक हवामान केंद्राच्या वैज्ञानिक शुभांगी भुते यांनी सांगितलं,
 
मुंबई परिसरातही पुढील 24 तासात पावसाचा इशारा देण्यात आला असून शनिवारी रात्री काही ठिकाणी पाऊस पडला.
चक्रीवादळामुळे वादळी वारे व जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून, मुंबईतील दहिसर, वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) आणि मुलुंड येथील कोव्हिड आरोग्य केंद्रांतील मिळून एकूण 580 कोविड बाधित रुग्णांचे महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये सुरक्षितपणे स्थलांतर करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.
 
चक्रीवादळामुळे मुंबईत ताशी सुमारे 60 ते 80 किलोमीटर वेगाने वादळीवारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून सोबत जोरदार पाऊसही कोसळू शकतो.
 
चक्रीवादळाचा मुंबई महानगराला थेट धोका नसला तरी मुंबई किनाऱ्याला लागून ते जात असल्याने, वादळीवारे व मुसळधार पावसाची शक्यता पाहता, खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोव्हिड रुग्णांचे सुरक्षित स्थलांतर केले जात आहे.
या कालावधीत मुंबई आणि परिसरात वेगवान वाऱ्यांसह पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी महापालिकेच्या सर्व संबंधीत यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश यापूर्वीच दिले आहेत.
 
पुढील 2 दिवस मुंबईतील लसीकरण बंद राहील, अशी माहितीही मुंबई महापालिकेने दिली आहे.
नागरिकांनी प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांकडे लक्ष ठेवावं तसंच आवश्यक ती दक्षता बाळगावी, समुद्रकिनारी जाणं टाळावं, असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलं आहे.
 
मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (15 मे) किनारपट्टीवरील भागात पूर्णपणे सतर्कता ठेवावी आणि यंत्रणांना सावध राहून आवश्यक ते बचाव कार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सज्ज राहावं आणि मनुष्यबळ तसंच्या साधन सामुग्री तयार ठेवावी असंही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सांगितलं. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीच्या पूर्वतयारीच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज (शनिवार) विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.
 
हे वादळ मुंबईच्या जवळ येण्याची शक्यता असल्याने मुंबईत पुढील 2 दिवस मोठ्या प्रमाणात खबरदारी बाळगण्यात येत आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत दोन दिवस लसीकरणही बंद ठेवण्यात आलं आहे.
 
पण या तौकते वादळामुळे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर शुक्रवार रात्रीपासून जोरदार वारे वहायला सुरुवात झालेली आहे.
 
18 मे च्या पहाटे हे वादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज आहे.
 
केरळच्या किनारपट्टीला शुक्रवारी जोरदार लाटा आणि पावसाने झोडपून काढलंय. तर गोव्यामध्येही रात्री विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती