‘म्हाडा’ अधिकारी-कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी विनामुल्य कोरोना चाचणी

शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020 (09:15 IST)
महाराष्ट्र राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने ‘म्हाडा’तील अधिकारी-कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी कोविड-१९ विषाणू चाचणी शिबिराचे दिनांक ५ ऑक्टोबर पासून आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी दिली.
 
‘म्हाडा’च्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात तळ मजल्यावरील महाराष्ट्र गृहनिर्माण कर्मचारी संघटनेच्या कार्यालयात ९ ऑक्टोबर पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत चालणाऱ्या या शिबिरात म्हाडाच्या मुंबईस्थित सुमारे १३०० कर्मचाऱ्यांची व विनामूल्य कोविड चाचणी केली जाणार आहे. म्हाडा कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त सुरक्षा रक्षक , कंत्राटी कर्मचारी यांचीही या शिबिरात अँटीजेन आणि आवश्यकतेनुसार आरटी-पीसीआर चाचणी करण्यात येणार असल्याचे घोसाळकर यांनी सांगितले. कोविड-१९ विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावास रोखण्याकरिता या विशेष मोहिमेची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच एखाद्या कर्मचाऱ्याचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्यांच्या कुटुंबीयांचीही विनामूल्य चाचणी केली जाणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे उपलब्ध करून देण्यात आलेले एच पूर्व विभागाचे  डॉक्टर व प्रशिक्षित कर्मचारी यांचे पथक म्हाडातील कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी करणार आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याकरिता अधिकाधिक कर्मचाऱ्यांनी या शिबिरामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन म्हाडा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती