पुन्हा थंडी परतणार, उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह येऊन तापमानात घट होण्याची शक्यता

मंगळवार, 1 डिसेंबर 2020 (08:44 IST)
ढगाळ वातावरणामुळे सध्या राज्यात तापमानात वाढ झाली आहे. मात्र लवकरच थंडी परतणार आहे. उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह येऊन राज्यातील तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. या आठवडय़ात राज्यात थंडीसाठी अनुकूल स्थिती निर्माण होणार आहे.
 
समुद्रात ‘गती’ आणि ‘निवार’ या चक्रीवादळांच्या निर्मितीमुळे राज्यात ढगाळ वातावरण तयार झाले होते. त्यामुळे थंडी गायब झाली. त्यामुळे आता राज्यात निरभ्र आकाश आणि कोरडय़ा हवामानाची स्थिती निर्माण होत आहे. सध्या बंगालच्या उपसागरात तिसऱ्या चक्रीवादळाचे संकेत आहेत. बंगालच्या उपसागरात सध्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. १ डिसेंबरला त्याचे चक्रीवादळात रूपांतर होईल. ३ डिसेंबरला ते तमिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज आहे. या प्रक्रियेमुळे तमिळनाडू, दक्षिण केरळ भागांत अतिवृष्टी होईल. महाराष्ट्रात मात्र त्याचा परिणाम होणार नाही. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहाला चालना मिळून तापमानात २ ते ३ अंशांनी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आठवडय़ात काही प्रमाणात थंडी अवतरणार आहे.
 
मध्य महाराष्ट्रात सध्या रात्रीच्या किमान तापमानात मोठय़ा प्रमाणावर वाढ नोंदवली जात आहे. सरासरीपेक्षा ३ ते ६ अंशांनी अधिक तापमान या भागांत आहे. मराठवाडय़ातही तापमानाची स्थिती तशीच आहे. कोकण विभागात सरासरीच्या तुलनेत १ ते २ अशांनी वाढ असून, विदर्भात गोंदिया आणि अमरावती वगळता सर्वत्र तापमानात वाढ आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती