राज्यात मुसळधार पावसाची शक्यता धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार
पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे राज्यात २६ सप्टेंबरपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार तर मराठवाडा आणि विदर्भात मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. देशातून नैऋत्य मान्सूनचा परतीचा प्रवास २६ सप्टेंबरपासून सुरु होण्याची शक्यता आहे. सप्टेंबरच्या शेवटापर्यंत उत्तर भारतातील बऱ्याच भागातून मान्सून परतण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर २६ सप्टेंबरला संध्याकाळनंतर वादळी पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागने दिली आहे.
राज्यात ५ ऑक्टोबरनंतर मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटी राज्यात वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पाऊस परतणार असला तरी राज्यातील पाण्याची तूट भरून निघणे सध्यातरी अशक्यच दिसत आहे. यंदा राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पेरण्या कमी प्रमाणात झाल्या आहेत. अनेक ठिकाणी दुबार पेरणी झाल्यानंतरही शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागले नाही. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही उपस्थित होत आहे. सरासरीचा विचार करता पावसाची अजूनही तूट कायम आहे. ही तूट कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पुढील काळात दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.