शहापुर तालुक्यातील मुंबईला पाणी पुरवठा करणारे भातसा धरण शनिवारी ओव्हरफ्लो झाले आहे. धरणाचे दोन दरवाजे ०.२५ मीटर उघडण्यात आले असून १२४६.२६ क्युसेस इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापुर तालुक्यातील तानसा, मोडकसागर पाठोपाठ भातसा हे धरण देखील आता तुडुंब भरले आहे. शनिवारी ठिक दुपारी २.३० वाजता धरणाचे पाच पैकी धरण गेट क्रमांक १ आणि ५ हे दोन दरवाजे तातडीने उघडले असून भातसा नदी किनाऱ्या लगतच्या साजीवली, सरलांबे, तुते, सावरशेत, सापगाव, खुटघर, खुटाडी अशा अन्य गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, असे जलसंपदा विभागाच्या भातसा धरण विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश पाटील यांनी मााहिती देताना सांंगितले.