बीड: ‘तरुणांनी एकमेकांवर दगडफेक केली, आता त्यांना पाणी पाजायलासुद्धा नेतेमंडळी येत नाहीयेत’
शनिवार, 25 मे 2024 (10:27 IST)
“याठिकाणी एकमेकांवर केसेस होऊन जे तरुण अडकत आहेत त्यांना सोडवायलासुद्धा किंवा त्यांना पाणी पाजायलासुद्धा हे नेतेमंडळी येत नाही, एवढं तरुण वर्गानं मात्र ध्यानात ठेवलं पाहिजे. कुणाच्या ऐकण्यावरुन आपण एकमेकांच्या अंगावर गेलं नाही पाहिजे.”
तुकाराम जाधव सांगत होते. ते नुकतेच केजवरुन परत आले होते.
तुकाराम बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील नांदूरघाट गावात राहतात. काही दिवसांपूर्वी या गावात दोन गटांमध्ये दगडफेक झाली होती. सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे ही दगडफेक झाली होती.
याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये तुकाराम यांच्या मुलाचा समावेश आहे. तुकाराम यांचं गावात भांड्याचं दुकान आहे.
गावात प्रवेश केल्यावर भगवान बाबा यांच्या नावाचा चौक दिसून येतो. त्याच्यासमोर अगदी काही अंतरावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा चौक दिसून येतो.
या चौकांदरम्यान जो रस्ता आहे, त्याच्यावरच बीडमधील लोकसभेची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर दोन गटांत दगडफेक झाली होती.
गावात घडलेल्या घटनेविषयी विचारल्यावर तुकाराम यांनी बोलायला सुरुवात केली.
ते म्हणाले, “मराठा समाज आणि वंजारी समाज यांचे एकमेकाचे बांधाला बांध आहेत आणि त्यांचं कुठंही वितुष्ट नाही. पण या समाजामधले आणि त्या समाजामधले काही तरुण एकमेकाला पोस्ट आणि कमेंट करतात. यातून एकमेकाला घाणघाण बोलतात. तो राग मनात धरल्यामुळे त्यांनी एकमेकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.”
गावाला लागूनच हांगेवाडी, खाडेवाडी आणि ढाकणवाडी अशी गावं आहेत. हांगेवाडी गावात आम्ही पोहचलो तेव्हा तिथं पारासमोरील घरावर गोपीनाथ मुंडे यांचा मोठा बॅनर लावलेला दिसून आला.
पोलीस तपासात काय समोर आलं?
हांगेवाडीच्या शिवारात आमची भेट सुरेश हांगे यांच्याशी झाली.
गावातील घटनेविषयी बोलताना ते म्हणाले, “हे गट-तट पडण्याचं काही कारण नव्हतं. पण सोशल मीडियावर जी पोस्ट पडली ती ताईविषयी पडली. मग काय झालं दोन्ही समाजाचे समाजकंटक एकमेकांसमोर आले. यात खेडोपाडीचे बाहेरचे लोक गोळा झाले थोडेफार. मग इकडचे दहाएक जमले, तिकडचे दहाएक जमले आणि दगडफेक केली.”
नांदूरघाटमधील घटनेची बीड पोलीस चौकशी करत आहेत. बीडचे पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले, “नांदूरघाटमधील एका व्यक्तीनं सोशल मीडियावर काही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला होता. दोन गट एकमेकांसमोर आले होते आणि दोघांनी एकमेकांवर दगडफेक केली होती.”
“या प्रकरणात आतापर्यंत 5 आरोपी अटक केलेले आहेत. उर्वरित आरोपी शोधण्याची मोहीम चालू आहे. दोन्ही गटाकडून साधारणपणे 50 ते 60 लोक आयडेंटिफाय झालेले आहेत. त्यांचा देखील आपण शोध घेत आहोत. सध्या जे आरोपी आहेत ते पीसीआरमध्ये आहेत,” ठाकूर यांनी पुढे सांगितलं.
'निवडणूक 100 % जातीवर गेली '
नांदूरघाटमध्ये मराठा आणि वंजारी समाजाचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत, असं या गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या बोलण्यातून सातत्यानं समोर आलं. तरुण वर्ग मात्र टोकदार जातीय अस्मिता बाळगून असल्याचंही त्यांच्या बोलण्यातून जाणवलं.
बीडची यावेळची लोकसभा निवडणूक मात्र पूर्णपणे जातीवर गेल्याचं तुकाराम आणि सुरेश या दोघांचंही म्हणणं आहे.
तुकाराम म्हणाले, “राजकारण्यांकडून तर दोन्ही समाजाचा वापर करण्याचा सातत्यानं प्रयत्न केला जातो. विकासावर एकही राजकारणी बोलत नाही. बीड जिल्ह्याचा कसलाही विकास झालेला नाही. आणि इलेक्शन आले की फक्त जातीवर बोलणे, जातीचे मतं ओरबडून घेणे आणि कार्यभाग संपला की आपला आपला मार्ग धरणे.”
तर सुरेश म्हणाले, “निवडणूक जातीवर गेली ना 100 %. कारण निवडणुकीत, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, हे प्रश्न सगळे लांबच राहिले. बीडध्येच सगळ्यात जास्त जातीयवाद झाला, असं मला वाटतं.”
जातीय धुव्रीकरणाला तरुण बळी का पडताहेत?
बीडपासून जवळपास 60 किलोमीटर अंतरावर नांदूरघाट नावाचं गाव आहे. गावामध्ये मराठा आणि वंजारी यांच्यात सुप्त संघर्ष असल्याचं, हा गट मोठा की तो गट मोठा हे दाखवण्यासाठीचा हा संघर्ष असल्याचा आणि त्याचा लाभ राजकीय लोक घेत असल्याचं इथले तरुण खासगीत सांगतात. पण कॅमेऱ्यासमोर मात्र ही बाब बोलण्यास ते टाळतात.
निवडणुकीच्या काळात जातीय ध्रुवीकरणाला खतपाणी घातलं जाणं यात नवीन काही नाहीये. पण, तरुण पिढी याला बळी पडल्याचं दिसत आहे. मग यामागचं कारण काय आहे?
लेखक-समीक्षक डॉ. गणेश मोहिते हे बीडमधील बलभीम महाविद्यालयात प्राध्यापक होते.
त्यांच्या मते, “बीडमध्ये शिक्षणाचे प्रश्न आहेत, उद्योगधंद्याचे प्रश्न आहेत. बीडला बेरोजगारी आणि सिंचनाचा मोठा प्रश्न आहे. मग एवढे सगळे प्रश्न जेव्हा तुमच्यासमोर आ वासून उभे असतात, ते सुटत नाहीत तेव्हा तरुण पीढी सैरभैर होते. बीडमध्ये मराठ्यांमध्ये, वंजाऱ्यांमध्ये, सगळ्या जातींमध्ये तरुण टक्का मोठा आहे.
“त्याच्या हाताला कामच नाही. मग मोबाईलमधून दीड जीबी डेटामधून त्यांना जे मॅटर पुरवलं जातं, जो सगळा कंटेट त्यांच्यासमोर येतोय तो ध्रुवीकरणाचा आहे. त्याला ती पिढी बळी पडू लागलीय.”
राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे सुद्धा हाच मुद्दे पुढे नेताना म्हणतात, “तरुणांचं आज असं झालेलं आहे की, प्रत्येक खेड्यामध्ये जाऊन पाहा मोठं खेडं असेल तर 300-400, लहान असेल तर 5-50, सुशिक्षित बेकार तरुण हिंडताहेत, त्यांना दुसरा कोणताही मार्ग नाहीये. दुसरं म्हणजे मुलांची लग्नं होत नाहीत, खेड्यामध्ये आणि शेतीमध्ये काम करणाऱ्याला तर कुणी मुलगी देतच नाही. आणि तिसऱ्या बाजूला त्यांना मोबाईलचं भयंकर वेड लागलेलं आहे.”
'तरुणांनो तुम्ही तुमच्या व्यवसायाकडे लक्ष द्या'
या घटनेनंतर आपलं संपूर्ण कुटुंब अस्थिर झाल्याचं तुकाराम यांचं म्हणणं आहे. त्याबरोबरच तरुण वर्गाला त्यांचं काही सांगणंही आहे.
“तरुणांनो तुम्ही तुमच्या शिक्षणाकडे, तुमच्या व्यवसायाकडे आणि इतर प्रश्नाकडे लक्ष द्या. राजकारणामध्ये कुणाचंही काही चांगलं झालेलं नाही. फक्त राजकीय लोक तुमचा वापर करुन घेतात आणि मग सरळ सोडून देतात. त्यामुळे तुम्ही राजकारणाच्या मागे न लागता आपली शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती कशी सुधारेल, आपल्या आई-वडिलाला, आपल्या बापाला आपण कसा सपोर्ट करू, एवढं केलं तरी भरपूर काही होईल.”
बीडमध्ये जातीय अस्मिता अशा टोकदार झालेल्या आहेत. सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट त्याला खतपाणी घालत आहेत. यासंदर्भात बीड पोलिसांनी आतापर्यंत 100 जणांवर कारवाई केली आहे.
पण, आपले पोटाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, याची जाणीव इथल्या तरुण पीढीला करुन देणं गरजेचं असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.