नरेंद्र मोदींचं राहुल गांधींना 'बालक बुद्धी' संबोधून प्रत्युत्तर पण 'मणिपुरा'त वाहून गेलं भाषण
मंगळवार, 2 जुलै 2024 (20:34 IST)
राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर आभार प्रस्तावावरील चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (2 जुलै) लोकसभेत भाषण केलं.तेव्हा विरोधकांनी मोठा गदारोळ घातला.'मणिपूरला न्याय द्या, मणिपूरला न्याय द्या' अशा घोषणा देण्यात आल्या. तेव्हा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांना वारंवार खडसावलं. तरीही विरोधकांनी गदारोळ थांबवला नाही.संसदीय परंपरेला विरोधकांचं वागणं साजेसं ठरत नाही, असं म्हणत अध्यक्षांनी विरोधकांवर टीका केली.
नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीपासून थेट काँग्रेसवर हल्ले चढवले. याआधी राहुल गांधी यांनी राष्ट्रपतीच्या भाषणावर चर्चा करताना भाजप आणि मोदी यांच्यावर टीका केली होती.
विरोधी पक्ष सभागृहाच्या प्रतिष्ठेशी खेळत आहेत, अराजकता पसरवत आहेत आणि खोटे बोलत आहेत, असा आरोप करत मोदींनी केला.पंतप्रधान मोदींनी भाषण सुरू केले तेव्हा विरोधकांकडून जोरजोरात घोषणा देण्यात आल्या.
काही काळ पंतप्रधान मोदींचे भाषण थांबवून सभापती ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना विरोधी पक्षातील खासदारांना शांत करण्याचं आव्हान केलं. पण त्याने कोणताही फरक पडला नाही. उलट मोदींच्या संपूर्ण भाषणात घोषणाबाजी होत राहिली.
आपल्या भाषणात पंतप्रधानांनी आणीबाणीच्या 50 व्या वर्षपूर्तीचा उल्लेख करत इंदिरा गांधींच्या तत्कालीन सत्तेवर निशाणा साधला.
पंतप्रधांनाच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे -
NDA सरकारच्या काळात भ्रष्टाचाराबद्दल झिरो टॉलरन्स पाळण्यात आला.
भ्रष्टाचारामुळे देशाला ढेकणांसारखं पोखरलं होतं. ते आमच्या काळात पूर्णपणे थांबवलं आहे.
आधीच्या सरकारच्या काळात हजारो कोटी रुपयांचे घोटाळे झाले. घोटाळ्यांचं सरकार म्हणून त्यांची ओळख झाली होती.
2014च्या आधी लांगुलचालनाच्या राजकारणाने देशाला घेरलं होतं. आम्ही त्यांचा बिमोड केला.
2014च्या आधी देशावर दहशतवादी हल्ले व्हायचे. सामान्य लोकांचे जीव जायचे. पण आता आपला देश शत्रूच्या घरात घुसून मारत आहे. सर्जिकल स्ट्राईक करत आहे.
सध्या देशाच्या सुरक्षेसाठी भारत आता कोणत्याही स्तरावर जाऊ शकतो.
व्होट बँकेसाठी काही लोकांनी 370 कलमाचं हत्यार केलं होतं. त्यांनी भारतीय संविधान काश्मीरमध्ये लागू केलं नव्हतं.
आमच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेने 10 क्रमाकांवरून पाचव्या क्रमांकावर आघाडी घेतली.
गेल्या दहा वर्षांत देशातील करोडो महिलांना व्यावसायिक पातळीवर मदत केली. आता आम्ही 3 कोटी महिलांना लखपती करणार आहोत.
आमच्या तिसऱ्या टर्ममध्ये आम्ही तिप्पट गतीने काम करणार.
NDA ने सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन केलं आहे. ही एक ऐतिहासिक घटना आहे. तब्बल 60 वर्षांनी हा प्रसंग आला आहे. यावरून लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवल्याचं दिसत आहे.
काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा शंभरचा आकडा पार करू शकली नाही. काँग्रेसच्या इतिहासातली ही सलग तिसऱ्यांदा हार आहे.
1984च्या लोकसभा निवडणुका झाल्या. त्यानंतर 10 लोकसभा निवडणुका झाल्या. पण तेव्हापासून काँग्रेसला 250 चा आकडा पार करू शकली नाही. यंदाही त्यांना 99 वर थांबावं लागलं.
संसदेत काल (1 जुलै) बालिशपणा पाहायला मिळाला. सहानभूती मिळवण्यासाठी नवीन नाटक करण्यात आले. बालकबुद्धी असणाऱ्यांना व्यवहारज्ञान कमी असते.
असे बालिश लोक संसदेत कुणालाही मिठी मारतात. अधिवेशनात डोळे मारतात.
त्यांना (राहुल गांधी) यांना कोर्टात माफी मागावी लागली.
या संसदेत अग्नीवीर योजनेचं नाव घेऊन भारतीय सैन्यदलाचा अपमान करण्यात आला.
थोर पुरुषांचा अपमान करण्यात आला. या घटनेला बालिश बुद्धी समजून दुर्लक्ष करून चालणार नाही.
लोकसभा अध्यक्षांनी संसदेचं पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे.
आणीबाणी लागू करून आता 50 वर्षं होतायत. काँग्रेसने आपल्याच नागरिकांवर क्रूर पंजाचा वापर करण्यात आला.
दलित नेते बाबू जगजीवन राम हे पंतप्रधान होऊ नयेत यासाठी काँग्रेसने पूर्ण प्रयत्न केले.
देशातील हिंदूचा काँग्रेसने तिरस्कार केला. त्यांनी हिंदू दहशतवाद शब्द प्रचलित केला.
त्यांना हिंदुंची तुलना डेंग्यू आणि मलेरियाशी केली. हे सहन केलं जाणार नाही.
हिंदू धर्माची चेष्टा करणं ही त्यांच्यासाठी फॅशन झालीय. अशा गोष्टी थांबवायला पाहिजेत.
स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी हिंदू धर्माचा अपमान होतोय. यामागे कोणता प्रयोग सुरू आहे, हे तपासायला पाहिजे.
काँग्रेसने भारतीय सैन्यदलाला कधीच पाठबळ दिलं नाही. उलट नेहरूंच्या काळात आर्मी किती दुर्बळ होती हे तुम्हाला माहितीये.
काँग्रेसने वन रँक वन पेन्शन कधी लागू केली नाही. पण NDA सरकारने ही योजना लागू केली.