Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हाचा तडाखा बसत आहे. दोन दिवसांच्या दिलासानंतर रविवारपासून पुन्हा तापमानात मोठी वाढ झाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भाग वगळता उर्वरित राज्यात उष्णतेची लाट लक्षणीयरीत्या वाढली आहे. राज्याच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता. ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये तापमानात झपाट्याने वाढ झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने 43 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अकोला, अमरावती, परभणी आणि चंद्रपूरमध्ये सर्वाधिक उष्मा जाणवत आहे. हवामान खात्याच्या ताज्या अपडेटनुसार राज्यात येत्या चार ते पाच दिवसांत विदर्भ आणि लगतच्या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असून पाऊसही पडण्याची शक्यता आहे. काही भागात गारपीटही होऊ शकते. या काळात काही भागात कमालीचा उष्मा राहील.
IMD ने यलो अलर्ट जारी केला
सोमवारी विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 6 मे रोजी अकोला, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया परिसरात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोमवारी या भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.