एक लाख कोटी रुपये लागले तरी चालेल परंतु इथल्या लोकांना गोदावरी खोऱ्यातून पाणी देणार - अजित पवार

बीड - शेतकऱ्यांना आधार व मदत करण्याची भूमिका सरकारची आहे हे सांगण्यासाठी इथे आलो आहे. ऊसतोड मजूर कामगार मंडळ स्थापन केले. मजुरांच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यांच्यासाठी फिरते दवाखाने आहेत. त्यासाठी विशेष प्रयत्न धनंजय मुंडे आणि माझा राहणार त्यासाठी तुमचे सहकार्य हवे आहे. आम्ही थातूरमातूर उत्तर देणार नाही. एक लाख कोटी लागले तरी चालेल मला इथल्या लोकांना गोदावरी खोऱ्यातून पाणी द्यायचे आहे असे आश्वासन देतानाच राहिलेले प्रश्न निकाली काढण्यासाठी गप्प बसणार नाही असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेत बीडवासियांना दिला.
 
आम्ही का गेलो याची भूमिका सर्वांनी इथे मांडली. बीडकरांनी आमचे जंगी स्वागत केले त्याबद्दल अजित पवार यांनी आभार व्यक्त केले. तुम्ही मनावर घेतल्यावर काय करु शकता हे आज दिसले.बीडकरांनी चढउतार पाहिले आहेत. राजकारणात कधीच कोण कुणाचा दुश्मन किंवा मित्र कायम नसतो. मराठवाडा ही भूमी संताची आहे. त्यांचे दर्शन घेण्यासाठी इथे आलो आहे असेही अजित पवार यांनी सांगितले. 
 
बीड कष्टकऱ्यांची भूमी आहे. सरकारच्या माध्यमातून जनतेचे भले करायचे आहे. चढउतार राजकीय जीवनात येत असतात. आम्ही महापुरुषांचा आदर करणारे आहोत. महायुती सरकारमध्ये असलो तरी चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्व धर्मामध्ये जातीय सलोखा राखला गेला पाहिजे ही भूमिका आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत. पिक विम्यासाठी बीड पॅटर्न काढला. तुमचे पैसे राज्य व केंद्र सरकार भरत आहे. एक रुपयाचा उतरवला आणि सरकारवर साडे चार हजार कोटी रुपये कर्ज झाले मात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणे आवश्यक आहे ही भूमिका सरकारने घेतली. शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी किंवा समस्या तात्काळ सोडवल्या जातात मात्र विरोधक नेहमी चुकीचे सांगतात. सत्ता ही सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी असते. दोन लाख क्विंटल कांदा खरेदीचा निर्णय शेतक-यांसाठी घेतला. एवढ्या राज्यात वेगवेगळे प्रसंग येतात त्यातून मार्ग काढावा लागतो. आम्ही दिलेला शब्द पाळतो... मी शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलो आहे. शेतकरी ही माझी जात आहे. मराठवाडयातील पाण्याचा तुटवडा भरून काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जनतेचे प्रश्न, पाण्याचा प्रश्न, सहकार प्रश्न सोडवायचा असेल, लोकांनी दिलेला पैसा हा कष्टाचा व कराचा आहे तो चांगल्या कामासाठी खर्च झाला पाहिजे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार देशात आहे त्यांचा करिष्मा आहे त्याचा उपयोग झाला पाहिजे म्हणून आम्ही निर्णय घेतला. आता आपल्याला मागे वळायचे नाही. पदे घेतली ती मिरवण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी घेतलेली नाहीत. महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहोत आमच्या महिला बालविकास मंत्री अदिती यांच्या नेतृत्वाखाली महिलांचे चौथे धोरण मांडणार आहोत असेही अजित पवार म्हणाले. 
 
राजकीय मैत्री जपणारा हा बीड जिल्हा आहे. वैचारीक मतभेद आहेत पण राजकीय वैर नव्हते त्यामध्ये स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे आणि स्वर्गीय विलासराव देशमुख यांची मैत्री होती. क्रांतिसिंह पाटील हे सातारा येथील होते परंतु त्यांना बीडकरांनी निवडून दिले. बीड हा जिल्हा मैत्रीचा, आपुलकीचा, पुढे नेणारा जिल्हा आहे. 

मी काम करणारा माणूस आहे प्रशासनावर आमची पकड आहे. अधिकार्‍यांना विचारा चांगले काम केले तर पाठही थोपटतो. 
 
धनंजय मुंडे यांच्यापाठी नेहमी संघर्ष राहिला आहे परंतु त्याने जीवतोड काम करत लोकांच्या हदयात स्थान मिळविले आहे. त्याची एक वेगळी ढब आहे ती लोकांना आवडते. परळीत मोदींनी सभा घेतली परंतु हा पठ्ठा ३२ हजार मतांनी निवडून आला. केंद्र व राज्य एका विचाराचे आहे. नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्याशी चांगली ओळख झाली आहे. त्या ओळखीचा फायदा करुन घ्यायचा आहे. 'आनंदाचा शिधा' चा प्रस्ताव छगन भुजबळ यांनी आणला त्याला मान्यता दिली आणि राज्यातील जनतेला १०० रुपयात तो देण्याचा निर्णय घेतला. ज्यापद्धतीने प्रेम तुम्ही दाखवले आहे त्यामुळे तुमचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री पद राष्ट्रवादीला दिले जाईल असा शब्द अजित पवार यांनी दिला. 

लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना अशा एकत्र लढवायच्या आहेत. केंद्रात नरेंद्र मोदी यांचे तर राज्यात महायुतीचे सरकार आणायचे आहे असे आवाहनही अजित पवार यांनी केले. 
 
कोण काय बोलते याकडे लक्ष द्यायला मला वेळ नाही मला लोकांचा फक्त आणि फक्त विकास करायचा आहे. जे कोण काय बोलत आहेत त्यात तथ्य काही नाही. कठीण काम वेगाने करुन घेण्यासाठी राष्ट्रवादीचे लोक आहेत. सत्तेत राहून बहुजन, अल्पसंख्याक समाजातील लोकांसाठी काम करायचे आहे. टिकाकरांना कामातून उत्तर द्यायचे असतात हे धोरण माझे आहे. सकारात्मक राजकारण हा माझा व सहकार्‍यांचा शब्द आहे असेही अजित पवार म्हणाले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती