शिवछत्रपतींचा आशीर्वाद घेऊन मी दहा वर्षांपूर्वी कार्य सुरू केले होते. त्यावेळी महाराजांच्या साक्षीनेच देश बदलणार असल्याचे सांगितले होते. देशातील जनतेने १० वर्षांत स्वप्नांना प्रत्यक्षात येताना पाहिले आहे. जिथे इतरांची गॅरंटी संपते, तिथे मोदीची गॅरंटी सुरू होते. याच मोदी गॅरंटीच्या माध्यमातून मी आज सांगत आहे की येत्या काही वर्षांत मी देशातील २ कोटी महिलांना लखपती दिदी बनविणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. ज्यांनी आधी देशावर अनेक वर्ष राज्य केले, त्यांच्याकडे विकासाचे धोरण नव्हते. आधी हजारो कोटींच्या घोटाळयांचीच चर्चा व्हायची. पण आज हजारो कोटींच्या विकास प्रकल्पांची चर्चा होत असल्याचे मोदींनी सांगितले. तत्पूर्वी सकाळी नाशिकमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल सेतूच्या लोकार्पणासह विविध प्रकल्पांच्या शिलान्यास तसेच भूमीपूजन करण्यात आले. त्यानंतर नवी मुंबई येथे आयोजित जनसभेस त्यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी उपस्थित सर्वांना माझा नमस्कार असे म्हणत त्यांनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली. आजचा दिवस मुंबई आणि महाराष्ट्रासोबतच विकसित भारतासाठी ऐतिहासिक आहे. आज जगातील सर्वात मोठया समुद्रीसेतूंपैकी एक अशा अटल सेतूचे लोकार्पण झाले आहे. देशाच्या विकासासाठी आपण समुद्राशीही टक्कर घेऊ शकतो, लाटांनाही तोंड देऊ शकतो हे आपण दाखवून दिले आहे.