नाशिकच्या रामभूमीतून नरेंद्र मोदी फोडणार लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ

सोमवार, 8 जानेवारी 2024 (11:16 IST)
यंदा राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिकमध्ये होत असून  महोत्सवाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या हस्ते 12  जानेवारी होत आहे. नशिकच्या तपोवन येथील मैदानावर महोत्सव होणार आहे. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी योग्य ते नियोजन करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
 
राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी एकूण 20 समित्यांची नेमणूक करण्यात आली आहे. 75  शासकीय अधिकाऱ्यांवर विविध जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. शहरात तपोवन परिसरातील 16  एकर मैदानावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन होणार आहे.
 
याच पार्श्वभूमीवर तपोवनातील रस्त्यांचे डांबरीकरण केले जात आहे. तसेच मैदानांची डागडुजी देखील केली जात असून साफसफाई, मंडप उभारणी आणि इतर कामे सध्या युध्दपातळीवर सुरू आहेत. महोत्सवासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून 8 हजार युवक आणि खेळाडू नाशिकमध्ये दाखल होणार आहेत.
 
या उद्घाटन सोहळ्याला अंदाजे एक लाख नागरिक उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जर्मन टेक्नोलॉजीवर आधारीत 40 बाय 80 फूट मुख्य मंच येथे उभारला जात आहे. परराज्यातील 300 हून अधिक कामगार सध्या मेहनत घेताना दिसून येत आहे.
 
दुसरीकडे नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. दि.6 जानेवारी ते 11 जानेवारी दरम्यान विशेष स्वच्छता सप्ताह हाती घेण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्हा परिषदेच्या अधिनस्त सर्व विभागांना स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत.
 
पंतप्रधानांचं आगमन
ओझर विमानतळावर पंतप्रधानांचं आगमन : नाशिकमध्ये 12 ते 16 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. ओझर विमानतळावर पंतप्रधानांचं आगमन झाल्यानंतर तेथून हेलिकॉप्टरनं ते नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुल येथे आगमन होईल. हेलिपॅड ते तपोवन सभा स्थळापर्यंत त्यांचा रोड शो होणार आहे. दीड तासाच्या दौऱ्यात व्यासपीठावर पंधरा मिनिटांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. विकसित भारत 2047 या संकल्पनेवर आधारित 'युवको के लिये युवको द्वारा' अशी या कार्यक्रमाची संकल्पना असणार आहे.
 
स्टार्टअपचं सादरीकरण : 
स्टार्टअप सादरीकरण, एक्स्पो फूड फेस्टिव्हल महोत्सवात तपोवन निलगिरी बागेत होणार आहे. ज्याद्वारे महाराष्ट्राची खाद्य संस्कृती तसंच स्टार्टअप प्रकल्पाचं सादरीकरण होईल, शेकरू प्राण्याच्या बोधचिन्हाद्वारे महाराष्ट्राचं ब्रँडिंग करण्यात येणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं.
 
म्हणून मोदींचं शक्तिप्रदर्शन : 
महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघावर भाजपाने लक्ष केंद्रीत केलं असून, त्यासाठीच शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला सोबत घेतलं आहे. या दोन्ही गटांच्या जोरावर राज्यात सत्ता मिळवली असली, तरी लोकसभेत या दोन्ही गटांना सोबत घेऊन कितपत यश मिळेल याबाबत भाजपामध्येच साशंकता आहे. त्यामुळं भाजपाने आता राज्यात थेट मोदींनाच उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकची निवड करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या माध्यमातून मोदी नाशिकमध्ये शक्तिप्रदर्शन करणार आहेत. त्यांचा शहरात रोड शो करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत.
 
Edited By -  Ratnadeep ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती