कलेक्टर ऑफिसमधील कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये एकही एसी लावला जाणार नाही, असा अजब निर्णय बीड जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी घेतला आहे. बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी बीड जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी स्वत:च्या केबिनपासून सुरुवात केली आहे. दीपा मुधोळे-मुंडेंनी केबिनमध्ये एसीची हवा नको, आणि त्यांच्या केबिनमधील दरवाजे खिडक्या नेहमी उघड्या असाव्यात. यानंतर त्यांना दिलेल्या व्हीआयपी गाडीतही एसी नसावा आणि त्यांच्या गाडीच्या काचा उघड्या असाव्यात. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये असलेला एसी बंद करण्यास सांगितले आहे. फॅन आणि खिडकीतून येणारी नैसर्गिक हवा असावी, असे आदेश दीपा मुधोळे-मुंडेंनी ऐन उन्हाळ्यात दिला आहे.
बीड जिल्ह्यातील पहिल्याच स्त्री जिल्हाधिकारी म्हणून दीपा मुधोळ-मुंडे यांची नोंद झाली आहे. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे प्रत्येक कामावर आणि अधिकाऱ्यांवर लक्ष देत काम करून घेत असल्याचे दिसून येत आहेत. “माझ्या कार्यलयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपले वाटले पाहिजे. बाहेर येणारी प्रत्येक व्यक्ती सरळ एसीत आल्यानंतर थंड हवा सहन करू शकत नाही. आणि सरकारी यंत्रणेत काम करणाऱ्यांना एसीची हवा कशासाठी हवी? ज्या ठिकाणी सरकारी कार्यालये आहेत त्या ठिकाणी झाडांनी नटलेली बाग, मोकळी हवा असलेले कार्यालय असतात. या सर्वांचा आपण आस्वाद घेण्याची गरज असते. मग एसीच्या हवेची गरज कशाला?”, असा सवाल दीपा मुधोळ-मुंडे यांनी उपस्थित केला आहे.