रायगडच्या महाड-पोलादपूरमध्ये दरड कोसळून 36 जणांचा मृत्यू
शुक्रवार, 23 जुलै 2021 (14:47 IST)
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून 32 जणांचा मृत्यू झाला आहे, तर पोलादपुरातील सुतारवाडी गावात दरड कोसळून 4 जणांचा मृत्यू झाला आहे. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी ही माहिती ANI ला दिली.
तळीयेतील दुर्घटनेबाबत रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीशी बोलताना माहिती दिली की, "तळीये गावावर दरड कोसळली असून, आतापर्यंत 30 ते 32 मृतदेह सापडले आहेत. पावसाचा वेग जोरात असल्यानं अडचणी येत आहेत. हा सगळा चिखल आणि दलदलीचा भाग आहे."
तसंच, "तीन ते चार तासात मृतदेह बाहेर काढावे लागणार आहेत. कारण पाच-सहा वाजल्यानंतर काळोख होईल. त्यामुळे अडचणी निर्माण होतील," अशीही माहिती आदिती तटकरेंनी दिली. या घटनास्थळी दहा ते बारा रुग्णवाहिका, तसंच एनडीआरएफची पथकंही इथं दाखल झाली आहेत.
पोलादपुरात दरड कोसळून 4 जणांचा मृत्यू
रायगड जिल्ह्यातील पोलादपूरमधील सुतारवाडी परिसरात दरड कोसळून 4 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 4 जण जखमी झाले आहेत. महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमनं ही माहिती दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, पाच लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.
महाराष्ट्र सरकारच्या विनंतीनंतर नौदलाचे जवान पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हजर झाले आहेत. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील लोकांच्या मदतीसाठी नौदलाचे सात चमू रवाना झाले आहेत. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या माहितीनुसार, एनडीआरएफच्या पथकाला या घटनेबाबत माहिती दिली आहे. मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात महाड तालुक्यात ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. त्यामुळे घटनास्थळी पोहोचण्यास प्रशासनाला अडथळा येत असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.
दुसरीकडे, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारकडे मदतची मागणी केलीय. महाडमध्ये पावसाच्या पाण्यात अडकलेल्यांच्या मदतीसाठी लष्कराच्या मदतीची मागणी करण्यात आलीय.
संजय मोहिते, पोलीस महानिरीक्षक, कोकण रेंज यांनी, "चिपळूण आणि महाडमधून पाणी कमी होण्यास सुरुवात झाली आहे. खेडमध्ये दरड कोसळण्याच्या तीन घटना निदर्शनास आल्या आहेत. याबाबत पुढील माहिती घेण्याचं काम सुरू आहे. महाड आणि चिपळूणमध्ये काही लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. रेस्क्यू करण्यात आलं", अशी माहिती दिली आहे. 'कोकणात कम्युनिकेशन आणि दळणवळण पूर्णपणे थांबलेलं आहे. माणगावहून पुढे जाण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, परंतु रस्त्यावर पाणी भरलेलं असल्याने पुढे जाता येत नाही! परिस्थिती पाहता, चिपळूणसह ज्या ज्या ठिकाणी जास्त पाणी भरलेलं आहे, तिथे वेळेत मदत पोहोचणं आवश्यक आहे.' असं ट्वीट विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलं आहे.
NDRF कडून बचावकार्य सुरू
NDRF कडून नागरिकांना सुखरूप वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला जाईल, आमची पथकं घटनास्थळी पोहोचत आहेत, अशी माहिती एनडीआरएफचे महासंचालक सत्य नारायण प्रधान यांनी दिली. त्यांनी तसं ट्वीट केलं आहे. कालपासून (22 जुलै) रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, अकोला अशा विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. कोकणात चिपळूण आणि खेड परिसरात पुराचा तडाखा बसला असून रायगडमधील महाड-पोलादपूर भागात मोठा फटका बसला आहे.
मुसळधार पावसामुळे आपत्ती व्यवस्थापन सतर्क झाले आहे. NDRF ची 9 पथके रवाना करण्यात आली आहेत. नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी NDRF आणि हवाई मार्गाने बचाव कार्य सुरू झाले आहे.