पूरग्रस्तांना आता ५ ऐवजी १० हजार तातडीची मदत-उपमुख्यमंत्री अजित पवार

मंगळवार, 25 जुलै 2023 (08:21 IST)
पूरग्रस्तांना दिल्या जाणा-या मदतीत वाढ करण्यात येत असून ५ हजार रुपयांऐवजी प्रतिकुटुंब १० हजार रुपयांची तातडीची मदत दिली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधिमंडळात केली. निकषात बसत नसले तरी अधिकृत दुकाने आणि टपरीधारकांनाही नुकसानीपोटी मागील वर्षाप्रमाणे मदत दिली जाईल, असेही अजित पवार म्हणाले. अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. उद्या राज्यातील सर्व जिल्हाधिका-यांशी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून संपूर्ण अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा आढावा घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.
 
राज्यातील अतिवृष्टी, पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ, अकोला, बुलडाणा, वाशिम जिल्ह्यांतील परिस्थितीबाबत अजित पवार यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत निवेदन केले. २३ जुलै रोजी राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. यवतमाळ, बुलडाणा, वाशिम येथे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे. या ठिकाणी मंत्र्यांनी भेटी दिल्या आहेत. ज्या ठिकाणी पूर परिस्थितीमुळे मृत्यू झाले आहेत, त्या ठिकाणी मृताच्या नातेवाईकांना ४ लाख रुपये तातडीने द्यावेत, असे आदेश दिले आहेत. ज्यांच्या घरात पाणी शिरले होते, त्यांना १० हजार रुपये मदत करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे.


Edited By- Ratnadeep Ranshoor
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती