किशोर आवारे हे शुक्रवारी दुपारी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना भेटण्यासाठी गेले होते. मुख्याधिकाऱ्यांना भेटून ते इमारतीच्या खाली आले. तळेगाव (Talegaon) नगरपरिषदेच्या समोर येताच चार जणांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. आवारे यांच्यावर गोळीबार तसेच कोयत्याने वार करण्यात आले. यात आवारे यांना दोन गोळ्या लागल्या. किशोर आवारे यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरीत यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. राजकीय वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मारुती चौकातील नगर परिषदेसमोर आवारे यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. नगर परिषद कार्यालयासमोर दुपारी ही घटना दोनच्या सुमारास घडली.दबाधरून बसलेल्या चौघांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.दोघांनी गोळीबार ने तर दोघांनी कोयत्याने वार करून त्यांच्यावर हल्ला केला. नंतर आवारे हे जखमी अवस्थेत तिथेच रक्ताच्या थारोळ्यात पडून होते. त्यांना तातडीने सोमाटणे फाटायेथे एका खासगी रुग्णालयात दाखल केले उपचारादरम्यान त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. तळेगाव दाभाडेच्या माजी नगराध्यक्षा सुलोचनाताई आवारे या त्यांच्या मातोश्री आहेत. घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलिसांसह मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.आवारे यांच्यावर सायंकाळी 8 वाजता तळेगाव दाभाडे येथील बनेश्वर स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.