रेमडेसिविर मिळत नसल्याने नातेवाईकांचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणं आंदोलन

गुरूवार, 15 एप्रिल 2021 (15:28 IST)
पुण्यातील कोरोनाबााधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मात्र त्या तुलनेत जिल्ह्याला रेमडेसिविरचा पुरवठा होत नसल्यानं रुग्णांचे नातेवाईक रस्त्यावर उतरले आहेत. नातेवाईकांनी बंडगार्डन चौक अडवला असून ते आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करणार आहेत. रेमडेसिविर मिळत नसल्यानं नातेवाईक हतबल झाले असून अनेकांना अश्रू अनावर होत आहेत.
 
सरकार, प्रशासनाकडून रेमडेसिविरचा पुरवठा होत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक संतप्त झाले आहेत. विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी आज सकाळी बंडगार्डन चौकात ठिय्या दिला. काळ्या बाजारात इंजेक्शन मिळत असल्याची तक्रार यापैकी अनेकांनी केली. नातेवाईकाला इंजेक्शन नाही तर मृत्यूचा दाखला घ्यायचा का?, असा सवाल आंदोलन करत असलेल्या गीता गोयल यांनी उपस्थित केला.
 
गीता यांचे पती सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. आमच्यासमोर इतरांना इंजेक्शन देतात. पण आम्हाला देत नाहीत. मी गेल्या ४ दिवसांपासून सगळीकडे फिरतेय. पण इंजेक्शन मिळालेलं नाही. सरकार आमच्या मृत्यूची वाट बघतंय का?, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती