पुणे : वारकऱ्यांवरील लाठीमार प्रकरणी दावे-प्रतिदावे

सोमवार, 12 जून 2023 (21:07 IST)
पुणे  : आळंदी प्रस्थान सोहळय़ात वाकऱ्यांवर झालेल्या लाठीमार प्रकरणात दावे-प्रतिदावे करण्यात येत असून, त्यासंदर्भातील व्हिडिओही समोर आणण्यात आले आहेत. दरम्यान, विरोधी पक्षाच्या नेत्यांनी यावरून सरकारला धारेवर धरले असून, सत्ताधारी नेत्यांनी मात्र लाठीमार झाला नसल्याचे म्हटले आहे.
 
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळय़ाचे रविवारी प्रस्थान झाले. सोहळय़ात वारकऱ्यांवर लाठीमार झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तर वीस पोलिसांनी चार जणांना मारहाण केल्याचा आरोप व्हिडीओच्या माध्यमातून वारकरी विशाल पाटील यांनी केला आहे. मी जोग महाराज संस्थेचा विद्यार्थी आहे. आम्हाला प्रस्थान सोहळय़ाला दरवषी सोडतात. आम्ही सोडा, असे विनवले. पण, अचानक ठरले, की आम्हाला आत सोडायचे नाही. आम्हा चार विद्यार्थ्यांना वीस पोलिसांनी मारहाण केली. एकांतात घरात नेऊन मारले. आमच्यावर हात उचलला. भविष्यात इतर वारकऱ्यांवरही असे हात उचलू शकतात. पोलिसांनी मारहाण का केली, याचे उत्तर द्यावे, असा प्रश्नही पाटील यांनी केला.
 
हे प्रकरण ताजे असताना आता या ठिकाणचा आणखी व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असतानाही काही तरुण वारकरी हे नियम डावलून मंदिराच्या दिशेने धावत असल्याचे पाहायला मिळत आहे. आळंदीत लाठीमार झाला नाही. किरकोळ झटापट झाली, असे पिंपरीचे आयुक्त विनयकुमार चौबे यांनी कालच स्पष्ट केले होते. दरम्यान, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मात्र लाठीमार झाल्याचे व्हिडिओतून स्पष्टपणे दिसत असल्याचे म्हटले आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती