पुण्यात लग्नात गुलाबजामवरुन हाणामारी

गुरूवार, 27 एप्रिल 2023 (16:53 IST)
पुण्यात एका लग्नात शिल्लक राहिलेले गुलाबजाम घरी घेऊन जाण्यावरून इतका वाद वाढला की हाणामारी झाली. मंगळवारी एका लग्नात नातेवाइक व केटरर्स व्यवस्थापक यांच्यात हाणामारी झाल्याची घटना शेवाळेवाडी येथे सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. प्रकरण इतकं वाढलं की हडपसर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
जखमी केटरर्स व्यवस्थापक दिपांशु गुप्ता (वय 26) यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. 
 
हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेवाळेवाडी येथील राजयोग मंगल कार्यालयात लोखंडे आणि कांबळे कुटुंबाचा विवाहसोहळा होता. केटरिंगचे काम गुप्ता यांच्याकडे होते. सुमारे दीड वाजता लग्न पार पडलं आणि सर्व पाहुण्यांचे जेवण झाले. नंतर सायंकाळी सहाच्या सुमारास वरपक्षाकडील व्यक्तीने राहिलेले अन्न सोबत घेऊन जायचे असल्याचे सांगितल्यावर गुप्ता यांनी हरकत नसल्याचे सांगितले. 
 
नातेवाइक उरलेले पदार्थ डब्यात भरत असताना त्यातील एक जण गुलाबजाम देखील डब्यात भरू लागला. मात्र हे गुलाबजाम तुमचे नसून ते उद्याच्या लग्नाच्या जेवणासाठी तयार केलेले आहे अशात ते घेऊ नये असे गुप्ता यांनी सांगितले. यावर शाब्दिक वाद वाढला आणि नातेवाईकांनी गुप्ता यांना मारहाण केली. एवढेच नव्हे तर लोखंडी झारा मारून जखमी केले. 
 
गुप्ता यांचे मालक तिथे आल्यावर आरोपींनी पळ काढला. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती