कार्बन डेटिंग म्हणजे काय? त्यातून काशीचं 'खरं' शिवलिंग सापडेल का?
शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2022 (16:02 IST)
वाराणसीतल्या ज्ञानवापी मशिदीत कथित शिवलिंग सापडल्याचा दावा काही लोकांनी सर्वेक्षणानंतर केल्यावर आता त्यावर कोर्टात सुनावणी झाली आहे. तिथं सापडलेल्या कथित शिवलिंगाचं कार्बन डेटिंग करण्याची मागणी करण्यात आली होती. पण कोर्टानं त्याची मागणी फेटाळून लावली आहे.
कार्बन डेटिंग म्हणजे काय?
कार्बन डेटिंग म्हणजे वय शोधणं. या प्रक्रियेत खूप वर्षांपूर्वी जिवंत असणाऱ्या एखाद्या सजीवाचं वय शोधता येतं.
सजीव जोपर्यंत जिवंत असतात तोपर्यंत त्यांच्यात विविध स्वरूपात कार्बन साठवलेला असतो. या कार्बन डेटिंगमध्ये कार्बनमध्ये C-14 नावाचा एक विशेष समस्थानिक म्हणजे आयसोटॉप असतो. याचं अणू वस्तुमान 14 इतकं असतं. हा कार्बन रेडिओऍक्टिव्ह असतो. आणि जसं जसं त्या सजीव वस्तूचा क्षय व्हायला लागतो तसतसं हा कार्बनही कमी व्हायला लागतो.
उदाहरण म्हणून घ्यायचं झालं तर जेव्हा एखादं झाड किंवा प्राणी मरतो तेव्हा त्याच्या शरीरात असणाऱ्या कार्बन-12 आणि कार्बन-14 चं गुणोत्तर बदलू लागतं आणि हा बदल या कार्बन डेटिंग प्रक्रियेत मोजता येतो. यावरून त्या जीवाचा मृत्यू कधी झाला याचा अंदाज बांधता येतो.
आता कार्बन डेटिंग प्रभावी असलं तरी त्याचा वापर निर्जीव गोष्टींच्या वयाच्या निश्चितिसाठी करता येणं तसं अवघड आहे. म्हणजे एखाद्या खडकाचं वय या प्रक्रियेद्वारे सांगता येत नाही.
सोबतच 40 ते 50 हजार वर्षांपूर्वीचं वयोमान काढण्यासाठी कार्बन डेटिंग करता येणं शक्यच नाही. यामागे कारण असं आहे की, आयुष्याची आठ ते दहा चक्र पार केल्यावर त्यात असणाऱ्या कार्बनचं प्रमाणही नगण्य होऊन जातं.
एखाद्या ऐतिहासिक वास्तूचं कार्बन डेटिंग करता येऊ शकतं?
असं करता येणं शक्य आहे का? हे जाणून घेण्यासाठी बीबीसीने लखनऊच्या बिरबल साहनी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलेओसायन्सेसचे शास्त्रज्ञ डॉ. राजेश अग्निहोत्री यांच्याशी संपर्क केला.
यावर ते म्हणाले की, सजीवांच्या मृत्यूनंतर जर त्यांचं वय जाणून घ्यायचं असेल तर रेडिओ कार्बन डेटिंग हा एकमेव पर्याय आहे. ही माहिती मिळवून त्याला पुरातत्त्वीय संदर्भाशी जोडलं जातं आणि नंतर गोष्टी ठरवल्या जातात.
निर्जीव गोष्टीचं कार्बन डेटिंग करता येऊ शकतं का? यावर डॉ. राजेश अग्निहोत्री सांगतात की, "दगड किंवा धातूंचं डेटींग करता येत नाही, कारण त्यात कार्बन नसतो. पण या निर्जीव वस्तूंची स्थापना केली जाते तेव्हा धान्यस, लाकूड, कपडा किंवा दोरी सारख्या वस्तू वापरल्या जातात. या गोष्टीत त्यात सापडल्या तर त्याचं यांचं कार्बन डेटिंग करता येतं."
मग या जैविक गोष्टींच्या आधारावर एखाद्या स्मारकाच्या वयाचा अंदाज लावता येऊ शकतो का? यावर डॉ. राजेश अग्निहोत्री म्हणतात, "नक्कीच. या टेक्नॉलॉजीचा वापर करू एखाद्या स्मारकाच्या वयाचा अंदाज लावता येतो. आणि त्या काळातील इतर पुरातत्वीय माहितीसोबत याला जोडून पाहिलं जातं."
राजेश अग्निहोत्री पुढं सांगतात की, रामजन्मभूमी आणि इमामबारा यांचे ऐतिहासिक संदर्भ तपासण्यासाठी कार्बन डेटिंग करण्यात आलं होतं. भारतीय पुरातत्व विभागाने दिलेल्या नमुन्यांवर ही डेटिंगची प्रक्रिया करण्यात आली होती. तसंच हे नमुने एएसआय आणि बिरबल साहनी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलेओसायन्सेसने एकत्रितपणे गोळा केले होते.
काशीतलं शंकराचं मंदिर तोडून मशीद बांधली गेली होती का?