गांजाच्या पानांची भाजी मेथी समजून खाल्ली आणि संपूर्ण कुटुंबाची शुद्ध हरपली

गुरूवार, 2 जुलै 2020 (09:35 IST)
उत्तर प्रदेश येथील एका कुटुंबाने मेथी समजून चक्क गांज्याची भाजी शिजवून खाल्ल्याचा विचित्र प्रकार समोर आला आहे. नंतर कुटुंबाची शुद्ध हरपली आणि सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
 
कनूज येथील मियागानी गावामध्ये हा प्रकार घडला आहे. येथील एका भाजी विक्रेत्याने मेथीच्या नावाखाली या कुटुंबातील निलेश नावाच्या व्यक्तीला चक्क गांजा वनस्पतीची जुडी विकली. निलेशलाही काही कल्पना नसून त्याने त्याच्या वहिनीला ही भाजी दिली. तिने भाजी शिजवून कुटुंबातील सहा जणांनी भाजी खाल्ल्याने त्यांना त्रास जाणवू लागला. सर्वांची तब्बेत बिघडू लागली तेव्हा त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने डॉक्टरांशी संपर्क साधला. कुटुंबातील सर्व सदस्य बेशुद्ध पडले हा विचित्र प्रकार बघून शेजारच्यांनी थेट पोलिसांना फोन केला. त्यानंतर बेशुद्ध अवस्थेत सर्वांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं.
 
पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करत स्वयंपाकघरात कढईमध्ये शिजवलेली गांजांची तसेच उरलेली गांजाची पानही ताब्यात घेतली. या प्रकरणात पोलिसांनी भाजी विक्रेत्याला ताब्यात घेतलं आहे. भाजी विक्रेत्याने गमंत म्हणून निलेशला मेथीऐवजी गांजाची पानं दिल्याचे सांगितलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती