ही घटना 12 जानेवारीला 'डाकू महाराज' चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीची आहे. असे सांगितले जात आहे की, शोच्या आधी सिनेमागृहात एका मेंढीचा बळी देण्यात आला होता, या प्रकरणी आता पाच जणांना अटक करण्यात आली आहे. एका अधिकाऱ्याने शनिवारी अटकेची माहिती दिली.
अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणाची तक्रार 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स' (पेटा) ने ईमेलद्वारे पाठवली होती. मिळालेल्या तक्रारीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. या आरोपींनी मेढीची बळी देऊन तिचे रक्त अभिनेता एन. बालकृष्ण यांच्या पोस्टरला लावण्याचा आरोप आहे.
तिरुपती पूर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व्यंकट नारायण म्हणाले, “पेटा कडून एक ईमेल आला होता. त्यांनी एसपींना ईमेलद्वारे तक्रार केली होती. "त्याच दिवशी (16 जानेवारी) आम्ही तिरुपती पूर्व पोलिस स्टेशनमध्ये तपास केला आणि गुन्हा नोंदवला." नारायण म्हणाले की, या पशूबलीमध्ये सहभागी असलेल्या इतर लोकांचाही पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 जानेवारीला पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास मेंढ्याचा बळी देण्यात आला.