तामिळनाडूमध्ये गणेश रथाला विजेच्या तारा लागल्याने 2 ठार, 5 जखमी

गुरूवार, 1 सप्टेंबर 2022 (16:33 IST)
गणेश चतुर्थीच्या दिवशी तामिळनाडूत मोठी दुर्घटना घडली. विरुदनगर जिल्ह्यातील राजापलायमजवळील सोक्कनाथन पुत्तूर परिसरात गणेश रथाचा विद्युत तारेशी संपर्क आला आणि रथात विद्युत प्रवाह चालू असल्याने विजेचा धक्का लागून 7 जण जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला तर पाच जणांवर उपचार सुरू आहेत.
 
तिरुनेलवेली येथील शिवगिरी सरकारी रुग्णालयात 5 जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुनीश्वरन (24) आणि मारीमुथू (33) अशी मृतांची नावे आहेत. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मंत्री केकेएसएसआर रामचंद्रन आणि थंगम थेनारासू यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांची चौकशी केली.
 
विद्युत तारेचा अपघात
या घटनेची माहिती देताना विरुदनगरचे जिल्हाधिकारी म्हणाले की, गणेश रथयात्रा ज्या मार्गावरून जात होती त्या मार्गावर विद्युत तारा पडल्या होत्या. रथाच्या तारेशी संपर्क आल्याने जोरदार करंट आला आणि हा अपघात झाला. या घटनेबाबत चित्तूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती