मागासवर्ग आयोगाचा अहवाल लवकर प्राप्त करुन विधिमंडळाचे अधिवेशन बोलावावे आणि तसा प्रस्ताव मंजूर करुन केंद्राकडे शिफारस करुन घटनेमध्ये दुरुस्ती करण्याचा आग्रह सरकारने धरला पाहिजे. आमचं स्पष्ट मत आहे की पार्लमेंटमध्ये आम्ही तर पाठिंबा देणारच परंतु इतर पक्षांच्या लोकांसोबतही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आयांनी बोलून त्यांचाही पाठिंबा मिळवण्याची भूमिका घेतील अशी माहिती राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
मराठा समाजाच्या समन्वयकांची बैठक झाली असून त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी कोणत्याही प्रकारची बैठक किंवा चर्चा करणार नाही असा निर्णय घेतला आहे. मराठा समन्वयकांची मुख्यमंत्र्यांशी बोलण्याची तयारी आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याबाबत संवाद सुरू ठेवले पाहिजेत. त्या लोकांची मुख्यमंत्र्यांशी बोलण्याची तयारी असेल तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करुन हा प्रश्न निकाली काढण्यासाठी पाऊले उचलली पाहिजेत असेही नवाब मलिक म्हणाले.