आज पश्चिम बंगालमधील राज्य सचिवालयावर मोर्चा काढत आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ भाजपने 12तासांच्या बंदची हाक दिली आहे. या दरम्यान अनेक ठिकाणी भाजप आणि टीएमसीचे कार्यकर्त्ये एकमेकांशी भिडले. भाटपारा येथे बंगाल बंद दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या नेतावर गोळीबार केल्याचा आरोप भाजपनेते अर्जुनसिंह यांनी केला आहे. या गोळीबारात कार मधून प्रवास करणारा एक भाजप समर्थक जखमी झाला आहे. बंद मुळे राज्यातील अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे.
अनेक ठिकाणी भाजप आणि टीएमसी समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याचे वृत्त आहे. राजधानी कोलकातामध्ये सकाळपासूनच रस्त्यांवर गर्दी कमी आहे. रस्त्यांवर फार कमी बसेस, रिक्षा, टॅक्सी दिसतात. खासगी वाहनांची संख्याही कमी आहे. मात्र, बाजारपेठा आणि दुकाने पूर्वीप्रमाणेच सुरू आहेत. शाळा-महाविद्यालये सुरू आहेत पण बहुतांश खासगी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची उपस्थिती खूपच कमी आहे कारण त्यांना घरून काम करण्यास सांगण्यात आले आहे.