आसाम सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा अनुदान रकमेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. तसेच मृत सरकारी कर्मचाऱ्याच्या अनुकंपा अनुदानाच्या रकमेपैकी 20 टक्के रक्कम सरकार पालकांना देणार आहे. तर अनुदान रकमेच्या 80 टक्के रक्कम जोडीदाराला दिली जाईल. आसामचे मुख्यमंत्री हिम्मत बिस्वा सरमा यांनी मंगळवारी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अनुकंपा अनुदान रकमेबाबत मोठी घोषणा केली आहे.
तसेच ते म्हणाले की, अनेकदा दुःखाच्या वेळी कुटुंबात पैशांवरून फूट पडते. यामुळे याची मागणी सरकारी कर्मचाऱ्यांकडून सातत्याने होत होती. दु:खाच्या काळात कुटुंबे विभक्त होऊ नयेत अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या आई-वडिलांना 20 टक्के अनुकंपा रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कुटुंब जोडलेले राहील.
त्याचबरोबर गुवाहाटी येथील एका कार्यक्रमात सरकारी नोकरी मिळालेल्या तरुणांना त्यांनी नियुक्ती पत्रांचे वाटप केले. सरमा म्हणाले की, आम्ही सत्तेत आल्यावर एक लाख नियुक्तीपत्र देऊ, असे आश्वासन दिले होते. आज आम्ही 99097 नियुक्ती पत्रे वाटून एक पाऊल पुढे टाकले. तसेच मला खात्री आहे की या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात आपण एक लाख नियुक्त्यांचा टप्पा ओलांडू. आसाममध्ये भ्रष्टाचाराशिवाय लाखो तरुणांना सरकारी नोकऱ्या मिळाल्या 7 ऑगस्ट रोजी डेरगाव येथील एका कार्यक्रमात आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले होते की, राज्यातील लाखो तरुणांना सरकारी नोकऱ्या मिळाल्या आणि भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही.