शेख हसीना अजूनही भारतात मुक्कामी, बांगलादेश-भारत संबंधांवर काय परिणाम होईल?
बुधवार, 14 ऑगस्ट 2024 (09:25 IST)
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडून भारतात राहिल्यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांवर परिणाम होईल का?
राजकीय उलथापालथीने घेरलेल्या बांगलादेशात आणि भारतात हा प्रश्न आता वारंवार विचारला जात आहे.
5 ऑगस्ट 2024 रोजी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक रूप मिळाल्यानंतर शेख हसीना यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि त्यांनी भारत गाठला.
त्यानंतर 84 वर्षीय नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांची अंतरिम सरकारच्या नेतेपदी नियुक्ती झाली.
मात्र, नव्या सरकारचा भारताशी ताळमेळ कसा आहे, याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
शेख हसीना आणि त्यांचा अवामी लीग पक्ष भारताचा समर्थक आहे, असं मानलं जातं. संकटकाळात त्यांनी भारतात येणं यावरून दोन्ही देशातील संबंध किती गहिरे आहेत, हे दिसून येतं. मात्र, बांगलादेश सरकारने स्पष्ट केलं आहे की, शेख हसीना भारतात कितीही काळ राहिल्या तरी त्याचा दोन्ही देशांच्या संबंधांवर काहीही परिणाम होणार नाही.
अंतरिम सरकारमध्ये परराष्ट्र व्यवहार विभागाचे सल्लागार मोहम्मद ताौहिद हुसैन म्हणाले की, बांगलादेश कायम भारताशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करेल.
भारतासोबतच्या संबंधांवर बांगलादेशची भूमिका काय आहे?
गेल्या मंगळवारी (6 ऑगस्ट) परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी बांगलादेशच्या परिस्थितीवर राज्यसभा आणि लोकसभेत निवेदन दिलं. शेख हसीना यांचं भारतात येणं आणि बांगलादेशमध्ये असलेल्या भारतीय नागरिक आणि तिथल्या अल्पसंख्यांकाच्या स्थितीची माहिती दिली.
जयशंकर म्हणाले की, शेख हसीना भारतात आल्या आहेत आणि त्यांचं विमान दिल्लीत आलं आहे.
ते म्हणाले, “5 ऑगस्टला संचारबंदी असताना देखील निदर्शक ढाक्यात एकत्र आले होते. आम्हाला जितकं कळलं आहे, त्यानुसार संरक्षण दलांबरोबर झालेल्या बैठकीनंतर शेख हसीना यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
“अगदी शॉर्ट नोटीसवर त्यांनी भारतात येण्याची परवानगी मागितली. त्यानंतर आम्ही लगेच बांगलादेश प्रशासनाने फ्लाईट क्लिअरन्सची परवानगी मागितली आणि आम्ही ती तातडीने दिली. त्या दिल्लीला आल्या आहेत.”
बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार मोहम्मद तौहिन हुसैन यांना प्रश्न विचारला गेला की, शेख हसीना भारतात बराच काळ थांबू शकतात, अशा परिस्थितीत दोन्ही देशांमधल्या संबंधांवर काय परिणाम होईल?
द्विराष्ट्रीय संबंध हा मोठा विषय असल्याचे सांगत ते म्हणाले, “हा एक काल्पनिक प्रश्न आहे. जर एखादी व्यक्ती एखाद्या देशात राहत असेल, तर त्याने दोन देशांच्या संबंधांवर काय परिणाम होणार आहे? असं काहीच कारण नाही."
शेख हसीना सरकारी नोकरीत वादग्रस्त कोट्याविरुद्ध झालेल्या देशव्यापी आंदोलनानंतर बांगलादेश सोडून भारतात आल्या.
हुसैन म्हणाले की, "द्विराष्ट्रीय संबंध एक दुसऱ्याच्या हितसंबंधांवर आधारित असतात. मैत्रीसुद्धा हितसंबंधांसाठीच होते. जर हितसंबंधांवर काही परिणाम झाला तर पर्यायाने मैत्रीवर परिणाम होईल."
ते पुढे म्हणाले की, "बांगलादेश आणि भारताचे आपले काही उद्दिष्ट आहेत. ते त्यानुसार पुढे जातील. आमचं सरकार कायम भारताबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करेल."
दरम्यान, स्टेट हाऊसमधील आपल्या ऑफिसमध्ये काही पत्रकारांशी बोलताना मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे सल्लागार होण्याामागची गोष्ट सांगितली.
त्यांनी नाव न घेता शेख हसीना यांचा उल्लेख 'राक्षस' असा केला.
ते म्हणाले, शेवटी तो क्षण आला आहे. राक्षस निघून गेला आहे.
ते म्हणाले, मी हे यासाठी करतो आहे कारण देशातल्या तरुणांना ते हवं आहे. मी त्यांची मदत करू इच्छितो. हे माझं स्वप्न नव्हतं हे त्यांचं स्वप्न होतं. एकप्रकारे त्यांच्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्याचा मी प्रयत्न करत आहे.
मोहम्मद युनूस म्हणाले, राक्षस निघून गेला आहे
बांगलादेशमधील हंगामी सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस म्हणाले की, “आम्ही कायदा आणि सुव्यवस्थेला प्राधान्य देणार आहोत, जेणेकरून लोक कामावर जाऊ शकतील, शांततेत राहू शकतील.”
मोहम्मद युनूस म्हणाले की, “शेख हसीना बांगलादेश सोडून गेल्यावर सरकार कुठेही नव्हतं. 15 वर्षांनंतर एकाधिकारशाही असलेल्या सरकारनंतर जे काही उरलं आहे ते अतिशय खराब आहे.
“त्यांच्या सरकारने जे केलं ते समजण्याच्या पलीकडे आहे, प्रशासन काय असतं याचा त्यांना अजिबात अंदाज नव्हता. मात्र अराजकतेपलीकडे आजही बरीच अपेक्षा आहे.
“आम्ही इथे आहोत. देशासाठी एक नवा चेहरा. कारण आता राक्षस गेला आहे. त्यामुळे नवा उत्साह आहे.”
बांगलादेशमधील हिंदूंवर भारतात काय मत आहे?
शेख हसीना यांनी बांगलादेश सोडल्याबरोबर तिथे हिंदूंवर हल्ले होत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या.
एस. जयशंकर यांनी संसदेत सांगितलं की, भारत सरकार बांगलादेशमध्ये उपस्थित असलेल्या भारतीय नागरिक आणि अल्पसंख्यांकाच्या स्थितीवर नजर ठेवून आहे.
ते म्हणाले, “4 ऑगस्टला परिस्थिती गंभीर झाली होती. पोलीस, पोलीस ठाणे आणि सरकारी संस्थांवर हल्ले वाढले होते. त्याचबरोबर एकूणच हिंसाचारात वाढ झाली होती. सत्तेशी निगडीत असलेल्या लोकांच्या संपत्तीला लक्ष्य केलं जात होतं. त्याचबरोबर अल्पसंख्यांकाचे व्यापाप आणि काही ठिकाणी मंदिरांवर हल्ले केले जात होते. ही चिंतेची बाब आहे. हे किती मोठ्या प्रमाणावर झालं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही."
नवे नेते मोहम्मद युनूस यांनी रविवारी (11 ऑगस्ट) सर्व विद्यार्थ्यांना हिंदू, ख्रिश्चन आणि बौद्ध यांच्या समवेत सर्व अल्पसंख्याक लोकांचं रक्षण करण्याचं आवाहन केलं.
धार्मिकदृष्ट्या अल्पसंख्याक असलेल्या लोकांवर झालेल्या हल्ल्याबद्दल ते म्हणाले, “तुम्ही देशाला वाचवलं, आता तुम्ही काही लोकांना वाचवू शकत नाही?”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोहम्मद युनूस यांना शुभेच्छा दिल्या. मात्र, त्याचवेळी हिंदूंसह सर्व धार्मिक अल्पसंख्याक लोकांचं रक्षण करण्याचा आग्रहही केला. मात्र, असं असलं तरी बांगलादेशात हिंदूंवर हल्ले होत असल्याच्या बातम्या अजूनही येत आहेत. त्यावर देशातील अनेक नेते प्रतिक्रियाही देत आहेत.
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी एक्सवर लिहितात, “शेजारी बांगलादेशात अल्पसंख्याक लोकांवर सातत्याने हल्ले होत असल्याच्या बातम्या येत आहेत. ही चिंताजनक बाब आहे. कोणत्याही सभ्य समाजात धर्म, जात, भाषा किंवा विशिष्ट ओळखीच्या आधारावर भेदभाव, हिंसा आणि हल्ले अमान्य आहेत. बांगलादेशमध्ये परिस्थिती लवकरच पूर्ववत होईल अशी आम्हाला आशा आहे. तसंच तिथलं सरकार हिंदू, ख्रिश्चन, आणि बौद्ध धर्म मानणाऱ्या लोकांना संरक्षण देईल अशी अपेक्षा आहे.”
बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनीही या विषयावर ट्वीट केलं. त्या म्हणतात, “बांगलादेशात राहणारे हिंदू समाज आणि अन्य अल्पसंख्याक कोणत्याही जातीचे का असेना त्यांच्यावर होत असलेले हल्ले निंदनीय आणि दु:खद आहेत. .या प्रकरणी सरकारने गांभीर्याने पावलं उचललायला हवीत नाहीतर जास्त नुकसान न होऊन जावो.”
समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव लिहितात, “कोणताही समुदाय मग तो बांगलादेशातील वेगळा दृष्टिकोन असलेला बहुसंख्याक किंवा हिंदू, शीख, बौद्ध किंवा कोणताही धर्म, पंथ असलेला अल्पसंख्यक असो कोणीही हिंसाचाराचा शिकार व्हायला नको. भारत सरकारने मानवी हक्क संरक्षण म्हणून या प्रकरणाचा पाठपुरावा करायला हवा. हा आपल्या बाह्य आणि अंतर्गत सुरक्षेबद्दलचा गंभीर प्रश्न आहे.”