सवाई माधोपूरच्या रणथंबोर व्याघ्र प्रकल्पातून एका वर्षात 25 वाघ बेपत्ता झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. तसेच गेल्या वर्षभरापासून रणथंबोरमध्ये 75 पैकी 25 वाघांचा कोणताही ठोस पुरावा सापडला नसल्याचे वनविभागाच्या वाघ निरीक्षण अहवालातून समोर आले आहे.वर्षभरापासून हे वाघ बेपत्ता आहे. या खुलाशानंतर खळबळ उडाली असून रणथंबोरचे प्रधान मुख्य वनसंरक्षक पीके उपाध्याय यांनी सांगितले की, रणथंबोरच्या बेपत्ता वाघांच्या संदर्भात चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही समिती बेपत्ता वाघांची चौकशी करून अहवाल सादर करणार आहे. सवाई माधोपूरमध्ये वाघ बेपत्ता होण्यामागची कारणे काय आहेत, हे समिती शोधून काढणार आहे.तसेच ही समिती वाघ निरीक्षणाच्या सर्व नोंदींचा आढावा घेऊन अहवाल सादर करणार आहे. याशिवाय कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी निष्काळजीपणे आढळून आल्यास शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्तावही समिती सादर करणार आहे.