पोलिसच करायचा अमली पदार्थाची तस्करी, 7 लाखांच्या गांजा तस्करीत पोलीस कर्मचारी अटकेत

शुक्रवार, 11 फेब्रुवारी 2022 (13:19 IST)
मुंबईत विक्रीसाठी 150 किलो गांजा घेऊन येणाऱ्या सहा आरोपींना अटक करण्यात छत्तीसगढ पोलिसांना यश आले आहे. या सहा आरोपींमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. अटक करण्यात आलेला हा पोलीस कर्मचारी मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालय मुख्यालयात सेवेत असल्याची माहिती मिळत आहे. 
 
साजिद पठाण असं अटक करण्यात आलेल्या या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.  चक्क पोलीस कर्मचारीच गांजा तस्करी प्रकरणात अटक झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी 150 किलो गांजा जप्त केला आहे. पोलिसांनी आरोपींकडून हा गांजा जप्त केला असून त्यांच्या गाड्याही जप्त केल्या आहेत. बाजार भावानुसार जप्त केलेल्या गांज्याची किंमत 7 लाख 50 हजार इतकी आहे.
 
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अंकित जायसवाल, चांद पाशा यांचा समावेश असून हे दोन्ही आरोपी महाराष्ट्रातील निवासी आहेत. पोलिसांनी आणखी एका गाडीतून गांजासह आरोपींना अटक केली आहे. यामध्ये अजय पटेल, सूरज मौर्या, रितेश सिंग, साजिद पठाण यांचा समावेश आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती