तौक्ते चक्रीवादळः चक्रीवादळ कसं तयार होतं?

सोमवार, 17 मे 2021 (15:58 IST)
ओंकार करंबेळकर
तौक्ते चक्रीवादळाची तीव्रता वाढली असून पुढील काही तासांसाठी चक्रीवादळाचं केंद्र हे मुंबईपासून 160 किलोमीटरच्या आसपास समुद्रात आहे.
 
या वादळाच्या प्रभावामुळे रायगड, पालघर, मुंबई, ठाणे आणि रत्नागिरीमध्ये वेगवान वारे वाहत आहेत. मुंबईत जोरदार पाऊस पडत आहे.
 
गेल्या दोन वर्षांमध्ये चक्रीवादळं मुंबईजवळून गेल्याच्या बातम्या आपण वाचल्या असतील. 2020 साली निसर्ग या चक्रीवादळाचा तडाखा कोकणाला बसला होता.
 
यापूर्वी 2009 साली कोकणात फयान नावाचं चक्रीवादळ आदळलं होतं. आपल्या कोकण-मुंबईजवळ येणारी ही चक्रीवादळं तयार कुठे आणि कशी होतात? आणि ती एवढा प्रवास करून इथवर कशी येतात? याची उत्तरं जाणून घेऊ.
पृथ्वीच्या मध्यभागी विषुववृत्त आहे. म्हणजे इक्वेटर. त्याच्या उत्तरेला 23.5 अंशांवर कर्कवृत्त आणि दक्षिणेला मकरवृत्त आहे हे तुम्हाला माहिती आहे. शाळेतलं भूगालोचं पुस्तक आठवतंय? विषुवृत्ताच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या या भागाला उष्णकटीबंधीय प्रदेश म्हणतात. म्हणजेच ट्रॉपिकल रीजन.
इथं सूर्याची किरणं थेट पडत असल्यामुळं इथल्या समुद्राचं पाणी जास्त तापतं. आता पाणी जास्त तापलं की त्याची वाफ होते. गरम हवा, वाफ ही आपली जागा सोडून वरवर जाते हे तुम्हाला माहीत आहेच. आता ही हवा वर गेल्यामुळे समुद्राजवळ दाब कमी होतो.
 
हा कमी दाबाचा प्रदेश तयार झाल्यावर आजूबाजूच्या प्रदेशातली हवा ती पोकळी जागा भरण्यासाठी येते.
 
ही प्रक्रिया सतत सुरू असते. म्हणजे कमी दाबाच्या केंद्राभोवती जास्त दाबाच्या प्रदेशातले वारे पिंगा घालू लागतात. हळुहळू या वाऱ्यांचा वेग आणि गती वाढत जाते आणि एक चक्र तयार होतं.
 
चक्रीवादळाची दिशा
पृथ्वी स्वतःभोवती 24 तासात एकदा फिरते. याला परिवलन म्हणतात. यामुळे पृथ्वीच्या फिरण्यामुळे आणि वाऱ्याच्या दिशेनुसार चक्रीवादळाचा प्रवास सुरू होतो.
 
ही वादळं अनेक दिवस आणि शेकडो किलोमीटरचा प्रवास करू शकतात. त्यांच्या जन्माची ठिकाणं आणि नेमका प्रवास सांगता येणं कठीण असलं तरी अंदाज बांधता येऊ शकतो. जसं दरवर्षी हिवाळ्यात आंध्र-ओडिशाच्या दिशेने एक तरी चक्रीवादळ येतंच. किंवा अमेरिकेत फ्लोरिडामध्ये ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये मोठं चक्रीवादळ येतंच येतं.
 
सायक्लोन की हरिकेन?
अमेरिकेत जी चक्रीवादळं येतात त्यांना हरिकेन म्हणतात आणि आपल्याकडच्या वादळांना सायक्लोन म्हणतात. असं का? उत्तर एकदम सोप्पंय. अटलांटिक महासागरात येणाऱ्या चक्रीवादळांना हरिकेन म्हणतात.
 
तर आपल्याकडे म्हणजे हिंदी महासागरातल्या चक्रीवादळांना सायक्लोन म्हणतात. तर प्रशांत महासागरातल्या चक्रीवादळांना टायफून म्हणतात.
प्रत्येक चक्रीवादळाला एक नाव दिलं जातं. ते देण्याची एक पद्धत आहे. ती तुम्ही बीबीसी मराठीच्या वेबसाईटवर वाचू शकता. चक्रीवादळांची नावं नेमकी कशी ठेवली जातात?
 
चक्रीवादळाची धडक
चक्रीवादळाच्या मध्यभागी असणाऱ्या केंद्राला 'आय' किंवा 'डोळा' म्हणतात. शेकडो किलोमीटचा महासागरावरून प्रवास केल्यानंतर या चक्रीवादळाचा परीघ काही किलोमीटर लांबीचा होतो.
 
पण त्याचा वेग आणि शक्ती किनाऱ्यावर धडकल्यावर कमी होऊ लागते. या धडकण्याला 'लँडफॉल' असं म्हणतात. एकदा का किनाऱ्याला लागलं की चक्रीवादळाला सतत होणारा आर्द्र हवेचा पुरवठा थांबतो.
चक्रीवादळ संपत असलं तरी वाऱ्याच्या वेगामुळे आणि पावसामुळं किनाऱ्यावर नुकसान होतंच. तुम्ही कोणतं चक्रीवादळ अनुभवलंय का? तुमचा अनुभव खाली कमेंट्समध्ये नक्की लिहा. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तेही सांगा.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती