मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून भाई जगताप यांना हटविले; “यांच्या” कडे दिली जबाबदारी

शनिवार, 10 जून 2023 (07:44 IST)
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून भाई जगताप यांना हटवण्यात आले आहे.भाई जगताप यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर मुंबईत काँग्रेसने विविध मुद्यांवर आंदोलने केली. आगामी महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठीची चाचपणी सुरू केली होती. काँग्रेसचा आक्रमक चेहरा असणारे भाई जगताप यांना एका अहवालामुळे दूर सारण्यात आल्याची चर्चा आहे.
 
भाई जगताप यांच्या जागी माजी मंत्री आ.वर्षा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज ही नियुक्ती जाहीर केली आहे. मागील वर्षी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे प्रथम क्रमांकाचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. हंडोरे यांचा पराभवच भाई जगताप यांना भोवला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
 
आगामी मुंबई महापालिकेच्या तोंडावर भाई जगताप यांना मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरून दूर करण्यात आले आहे. वर्षा गायकवाड या धारावी मतदारसंघाच्या आमदार आहेत. मागील अनेक वर्षांपासून त्या काँग्रेसमध्ये सक्रीय आहेत. दिवंगत माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या त्या कन्या आहेत. वर्षा गायकवाड यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.
 
वर्षा गायकवाड यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती करून काँग्रेसकडून अनुसूचित जातींच्या मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न केला असल्याचे म्हटले जात आहे. मागील काही वर्षात अल्पसंख्याक, अनुसूचित जाती-जमाती आदी काँग्रेसचा मतदार घटक पक्षापासून दूर गेला होता.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती