कोरोनामुळे बर्याच गोष्टी बदलल्या आहेत. लग्नसोहळे कमी खर्चात आणि मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडत आहेत. मुलं ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. सौंदर्यप्रसाधनांचं क्षेत्रही याला अपवाद नाही. सध्या ऑरगॅनिक तसंच वेगन सौंदर्यप्रसाधनं खरेदी करण्याकडे ओढा वाढला आहे. त्यामुळे कंपन्यांनी वेगन उत्पादनं बाजारात उतरवायला सुरूवात केली आहे.
कोरोनामुळे जगभरातले लोक जागरूक होऊ लागले आहेत. घातक रसायनं, प्राणीजन्य घटकांच्या वापरामुळे होणार्या दुष्परिणामांची जाणीव होऊ लागल्यामुळे रसायनयुक्त सौंदर्यप्रसाधनांऐवजी वेगन तसंच ऑरगॅनिक म्हणजेच पूर्णपणे नैसर्गिक घटकांचा वापर करून तयार करण्यात आलेली उत्पादनं वापरण्यावर भर दिला जात आहे. सौंदर्यप्रसाधनांच्या जगात हा नवा बदल अनुभवायला मिळत आहे.
वेगन तसंच सात्त्विक आहाराला महत्त्व देणार्यांना आता वेगन सौंदर्यप्रसाधनं हवी आहेत. आपल्या मेकअप किटमध्ये नैसर्गिक घटकांनी युक्त सौंदर्यप्रसाधनं असावीत, असं अनेकींना वाटू लागलं आहे. महिलांच्या या बदलत्या अपेक्षा लक्षात घेऊन बहुराष्ट्रीय कंपन्यांनीही अशी उत्पादनं बाजारात उतरवायला सुरूवात केली आहे.