शंकर नारायण नवरे : आनंदाचे झाड उन्मळले

WD
मराठी साहित्यविश्वात आनंदाचे झाड लावणारे दिलखुलास आणि प्रसन्न साहित्यिक शं. ना. नवरे यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. डोंबिवलीतील खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कथा, चित्रपट कथा, नाटक, ललित लेखन, स्तंभलेखन या सर्वच प्रांतात अगदी समर्थपणे मुशाफिरी करत शं. ना. नवरे यांनी रसिकांच्या मनात स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. ७०-८० च्या दशकांतील मध्यमवर्गीय कुटुंबांतील सुख-दुःख, व्यथा-वेदना त्यांनी आपल्या साहित्यातून मांडल्याने साहित्यप्रेमींना ते आपल्या घरातलेच सदस्य वाटत होते. गोष्टी सांगण्याची त्यांची हातोटी आणि गप्पा मारण्याच्या स्वभावामुळेही त्यांनी अनेकांची मने जिंकली. म्हणूनच, शं. ना. हे इतर साहित्यिकांपेक्षा वेगळे होते आणि त्यांचे जाणे मराठी साहित्य वर्तुळाला चटका लावून गेले आहे.

त्यांनी कॉलेज जीवनापासून कथालेखनास सुरुवात केली. अत्यंत साधी-सरळ-सोपी भाषा आणि आपल्या अवतीभवती वावरणा-या व्यक्तींसारखीच पात्र त्यात होती. सत्यकथा, वाङ्मय शोभा, हंस, मोहिनी, विविधवृत्त, वसंत आदी मासिके-साप्ताहिकांतून त्यांनी कथालेखन केले.

ते फक्त कथालेखनातच अडकून पडले नाहीत. त्यांनी ललित लेखन, नाटके लिहिली. रंगसावल्या, गहिरे रंग, सुरुंग, गुंतता हृदय हे, वर्षाव, धुक्यात हरवली वाट, नवरा म्हणू नये आपला, धुम्मस, सूर राहू दे, गुलाम, हसत हसत फसवुनी, प्रेमगंध ही त्यांची नाटकं रसिकांना मनापासून आवडली. शन्नांच्या कथा आणि ललितलेख म्हणजे साहित्यप्रेमींसाठी पर्वणीच होती. त्यांचे २७ कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. स्वप्ने संपली तर माणसाच्या जगण्याचं कारणच संपून जाईल, असे शंनांना वाटायचे. म्हणूनच त्यांनी अगदी अनोख्या पद्धतीने मध्यमवर्गीय वाचकांना जीवनविषयक तत्त्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न केला, त्यांना भरभरून आनंद वाटला.

साहित्यविश्वातील भरीव योगदानाबद्दल शन्नांना अनेक मान-सन्मान मिळाले. कराडच्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. पण रसिकांचे प्रेम हाच आपल्यासाठी सगळ्यात मोठा सन्मान असल्याचे ते म्हणत. त्यामुळे त्यांच्या साहित्यावर प्रेम करणारा मराठी रसिक वर्ग मोठा आहे.

वेबदुनिया वर वाचा