मराठी कविता : नवरा

रंग हा प्रेमाचा तुम्हा सांगू कसा
चिडका असला तरी नवरा असतो आपुला
 
सकाळी भांडला तरी
वाटतो रात्री असावा घरी
दिवस भराचा अबोला
सायंकाळी सरतो तरी
रंग हा प्रेमाचा तुम्हा सांगू कसा              
 
सूर कटकटीचे रोज साधती नवे
आरोह, अवरोह होता
संगीत मैफल जणू सजे
असाच चालतो जीवन राग भैरवीचा
रंग हा प्रेमाचा तुम्हा सांगू कसा            
 
रोजच असतो एकच वाद
वरण भाजीत मीठ आहे फार
शर्टाची कॉलर आहे मळकी
पायजम्याची नाडी गेली आत
रंग हा प्रेमाचा तुम्हा सांगू कसा            
   
असेच धागे जुळती जीवनाचे
कधी गोड, कधी खारट
अश्रूंची असे डोळ्यावरती झालर
स्मित हास्य ओठांवारी
संसाराची असे धुरी
क्षण दोन क्षणांचे भांडण
असते साता जन्मांचे बंधन
असेच असावे सर्वाचे सह-जीवन
रंगपंचमी ही जीवनाची
सुख रंग उधळो सारे जीवन
हिच शुभेच्छा आमुची. 
 
सौं. स्वाती दांडेकर 

वेबदुनिया वर वाचा