Health Tips :निरोगी राहण्यासाठी कोणत्या वयात किती आणि कोणता आहार घ्यावा?

बुधवार, 25 जानेवारी 2023 (13:44 IST)
तुम्ही जगण्यासाठी खाता की खाण्यासाठी जगता? अन्न आणि आपलं नातंच मुळात गुंतागुंतीचं आहे. त्यात किमतीचा, उपलब्धतेचा आणि मित्र मैत्रिणींचा दबाव असतो. मात्र या सगळ्यात एक गोष्ट नेहमीच महत्त्वाची असते ती म्हणजे भूक- खाण्याची इच्छा.
 
भूकेची भावना झाली की शरीराला अन्नाची गरज आहे हे कळतं. ही एक नैसर्गिक भावना आहे. मात्र अनेकदा भूक लागलेली नसताना सुद्धा आपण खातो किंवा भूक लागली असेल तरी खात नाही.
 
नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून असं समोर आलं आहे की पदार्थाचा सुवास, आवाज, त्याची जाहिरात या सगळ्या गोष्टी अति खाण्यासाठी जबाबदार आहेत.
 
आपली भूकही निश्चित नाही. आपलं वय जसं वाढतं तशी भूकेतही फरक पडतो. शेक्सपिअर म्हणतो तसं भूकेचे सात टप्पे असतात. हे टप्पे एकदा समजून घेतले की अतिखाणं किंवा कमी खाणं आपण टाळू शकतो आणि या वृत्तींचे आरोग्यावरचे दुष्परिणाम टाळू शकतो.
 
बालपणीचा काळ सुखाचा
बालपणाच्या पहिल्या टप्प्यात शरीराची वाढ वेगाने होते. या वयात खाण्याच्या ज्या सवयी आहेत त्या पुढे आयुष्यातही तशाच राहतात. मग मूल आधी लठ्ठ होतं आणि वयोमानानुसार तो माणूस लठ्ठ होतं.
 
चिडचिडा स्वभाव किंवा एखाद्या पदार्थाची भीती यामुळे लहान मुलं खाण्यासाठी चिडचिड करतात. मात्र एखाद्या पदार्थाची सातत्याने दिलेली चव आणि एखाद्या पदार्थाबदद्ल सकारात्मक वृत्ती अंगी बाणवली तर लहान मूल नवनवीन पदार्थ विशेषत: भाज्या खाऊ शकतात.
 
एखादा पदार्थ किती खायचा, पदार्थाच्या प्रमाणावर कसं नियंत्रण ठेवायचं हाही अनुभव लहान मुलांनी घ्यायला हवा. एखादा पदार्थ संपवायलाच हवा असा आग्रह पालकांनी धरला तर भुकेला प्रतिसाद देण्याच्या त्यांच्या नैसर्गिक प्रवृत्तीला बाधा येऊ शकते.
 
तसंच त्यामुळे आयुष्याच्या नंतरच्या टप्प्यात अतिरिक्त खाण्याची सवय लागू शकते. जंक फुडच्या जाहिरातीत लहान मुलांना घेऊ नका असं आवाहन सरकार सोशल मीडिया, व्हीडिओ ब्लॉग्स, अप्सच्या माध्यमातून वारंवार करत असतं. पदार्थाच्या जाहिरातीनंतर तो पदार्थ खाण्याच्या वृत्तीत वाढ होते. त्यामुळे पर्यायाने वजन वाढतं.
 
वयात येताना आणि आल्यावर...
पौंगडावस्थेत जी भूक लागते त्यासाठी बहुतांशवेळा हार्मोन्स जबाबदार असतात. हे वय पौगंडावस्थेची नांदी आणि भैरवीही असते. या काळात मुलं कसं खातात त्यावरून ते पुढे काय खातील हे ठरतं.
 
याचाच अर्थ असा की पौंगडावस्थेत खाण्याच्या ज्या सवयी लागतात त्याचा परिणाम पुढच्या पिढ्यांवर होतो कारण हीच मुलं पुढे जाऊन पालक होतात. दुर्दैवाने त्यांना अनेकदा या वयात नीट मार्गदर्शन मिळत नाही, त्यांना खाण्याच्या योग्य सवयी लागत नाही आणि त्याचे दुष्परिणाम पुढच्या आयुष्यात दिसतात.
 
तरुण मुलींमध्ये पोषणमुल्यांच्या अभावामुळे होणारे आजार मुलांपेक्षा जास्त प्रमाणात आढळतात. मुलींमध्ये असलेल्या प्रजननक्षमतेमुळे हा फरक असतो. पौगंडवस्थेत असलेल्या मुली गरोदर झाल्या तर त्यांना हा धोका अधिक प्रमाणात असतो. कारण त्यांच्या शरीराची आणि गर्भाची वाढ एकत्रच होत असते.
 
विशीच्या टप्प्यावर किती भूक लागते?
या वयात जीवनशैलीत अनेक महत्त्वाचे बदल होतात. या वयात कॉलेज संपलेलं असतं, लग्न झालेलं असतं किंवा काही लोक त्यांच्या जोडीदाराबरोबर राहतात. काही लोक पालकही होतात त्यामुळे वजन वाढण्याची दाट शक्यता असते.
 
एकदा साचलं की शरीरातलं फॅट्सचं किंवा मेदाचं प्रमाण कमी करणं अतिशय कठीण असतं. जेव्हा आपण कमी खातो तेव्हा शरीर अधिक खाण्याबद्दल संकेत देतं. मात्र अति खाणं कमी करण्यासाठी जे सिग्नल असतात ते तुलनेने कमी तीव्रतेचे असतात.
 
त्यामुळे अती खाणं होतं.
 
एकदा खाल्लं की एक समाधानाची अवस्था असते. ही अवस्था हेसुद्धा आजकाल संशोधनाचा विषय झाला आहे. वजन कमी करताना हे अतिशय महत्त्वाचं असतं. कारण आपल्या शरीराला जेवढी आवश्यकता आहे, त्यापेक्षा कमी खाण्यामधला सर्वांत मोठा अडथळा हा सतत भूकेची जाणीव होणं हा आहे.
 
वेगवेगळे पदार्थ शरीराला वेगवेगळे सिग्नल देतात. आईस्क्रीमचा एखादा टब खाणं सोपं असतं. उदा, खाणं आता थांबवावं असे सिग्नल फॅट्स देत नाही. मात्र प्रथिनं, फायबर किंवा तंतूयुक्त आणि पाण्याचं प्रमाण जास्त असलेले पदार्थ खाल्ल्यास खाण्याचं समाधान लवकर मिळतं. त्यामुळे खाद्यसंस्कृतीशी निगडीत क्षेत्रात काम केलं तर आपण काय खातोय याचं संतुलन ठेवणं सोपं होतं.
 
तिशी, चाळिशी आणि धोके
हे दशक आणखीच वेगळं असतं. कारण या वयोगटात गुडगुडणाऱ्या पोटापलीकडे आणखी आव्हानं असतात. या वयात ताणही प्रचंड वाढलेला असतो. त्यामुळे भूकेच्या प्रमाणात आणखी बदल होतात.
 
साधारणपणे 80% लोकांमध्ये हा बदल आढळतो. हा वयोगट दोन गटांमध्ये विभागला जातो. एक जो अती खातो दुसरा जे त्यांची भूक कमी करण्याचा प्रयत्न करतात.  
 
या सगळ्या गोष्टी कुतूहल वाढवणाऱ्या आहेत. खाण्याचं व्यसन काय असतं याचा आजतागायत नीट छडा लागलेला नाही. अनेक तज्ज्ञ असं काही आहे हेच मान्य करायला तयार नाहीत.
 
एखादं काम मन लावून करणं किंवा परिपूर्णता हे गुण असतील तर त्याचाही ताण आणि खाण्याच्या सवयी संतुलिक करण्यासाठी उपयोग होतो.
 
कामाच्या ठिकाणी चटपटीत खाणं किंवा त्यासाठी मशीन बसवण्याचं प्रमाण कमी करणं हेही एक मोठं आव्हान आहे. आपल्या नोकरीच्या ठिकाणी लोकांचं आरोग्य राखण्यासाठी, त्यांचा ताण कमी करण्यासाठी आरोग्यदायी खाण्याच्या सवयी लावणं यासाठी  कंपन्यांनी प्रयत्न करायला पाहिजे.
 
पन्नाशीचे धोके
डाएट हा शब्द ग्रीकमधल्या डाअटिआ शब्दावरुन आला आहे. याचा अर्थ जीवनशैली असा होतो. आपण सवयीचे गुलाम असतो. एखादी गोष्ट आपल्या भल्याची आहे हे माहिती असूनही सवय बदलली जात नाही.
 
जीवनशैलीत बदल न करता आपल्याला जे खायचं आहे ते आपल्याला खायचंच असतं. ते खाऊनही निरोगी आरोग्य आणि मन हवं असतं. आपण वाट्टेल तसं खातो ते आपल्या बिघडलेल्या तब्येतीसाठी कारणीभूत ठरतं. ध्रूमपान, चुकीचं खाणंपिणं, शारीरिक व्यायामाचा अभाव, आणि मद्यपान याचा थेट परिणाम आरोग्य आणि प्रजनन क्षमतेवरही परिणाम होतो. चाळिशी ते पन्नाशीदरम्यान लोकांनी आरोग्याच्या स्थितीप्रमाणे खाणंपिणं निश्चित करावं. रक्तदाब, कोलेस्टेरॉल यांचे परिणाम तातडीने आणि ठळकरुपात दिसत नाहीत. त्यामुळे लोक बदल करत नाहीत.
 
साठी गाठल्यावर...
वयाच्या पन्नाशीनंतर स्नायूंचं वजन 0.5-1 टक्क्याने कमी होतं. दरवर्षी एक टक्के स्नायूंची झीज होते. स्कार्कोपेनिया असं या स्थितीला म्हटलं जातं. शारीरिक श्रमाचा अभाव, खाण्यापिण्यात मर्यादित प्रथिनं, महिलांमध्ये रजोनिवृत्ती यामुळे स्नायूंची झीज होण्याचा वेग वाढतो. पोषकमूल्यं असणारा आहार, व्यवस्थित शारीरिक हालचाल हे वाढत्या वयोमानाचे परिणाम मर्यादित राखण्याचे मार्ग आहेत. वाढत्या वयात परवडणारा उच्च प्रथिनंयुक्त आहार आवश्यक असतो. पण ही गरज पूर्ण होत नाही. प्रथिनयुक्त स्नॅक्सचे पदार्थ शरीरातली प्रथिनांची मात्रा वाढवण्यासाठी उपयुक्त वाटू शकतात. पण सध्या बाजारात भरपूर प्रमाणात प्रथिनं असणाऱ्या पदार्थांची कमतरता आहे.
 
सत्तरी आणि पुढे...
विविध औषधं, गंभीर आजारांवरही उपलब्ध असलेले उपचार यामुळे आयुर्मान वाढलं आहे पण त्याप्रमाणात आयुष्याचा दर्जा मात्र सुधारत नाही. असंच चित्र राहिलं तर आपल्या समाजात अधिकाअधिक वयोवृद्ध माणसांची तसंच शारीरिकदृष्ट्या अन्य कुणावर तरी अवलंबून राहावं लागणाऱ्या माणसांची संख्या वाढेल. साठी-सत्तरीनंतर भरपूर पोषणमूल्य असलेला आहार महत्त्वाचा असतो. वाढत्या वयात खाणं कमी जातं आणि भूकही कमी लागते. यामुळे अचानकच वजन कमी होतं आणि शरीर कृश होतं. आहार कमी झाल्यामुळे काही नवे आजार मागे लागू शकतात. अल्झायमरसारख्या आजारावरच्या उपचारांमुळे भूकेवर परिणाम होतो. खाणंपिणं हा एक सामाजिक स्वरुपाचा अनुभव आहे. साथीदाराचं निधन होणं किंवा कुटुंबातील सदस्याला गमावणं यामुळे अनेकजण एकट्याने जेवतात. यामुळे खाण्यातला आनंद हिरावला जातो. वाढत्या वयामुळे खाताना-चावताना अडचणी निर्माण होतात. दात ठिसूळ होतात. चांगल्या पद्धतीने चावता न आल्याने पदार्थ पचतानाही अडचणी निर्माण होतात. गंधांची जाणीव हरपली तर कमी खाल्लं जातं. आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यात अन्नाचं शरीरासाठीचं इंधन म्हणून असलेलं महत्त्व आपण दुर्लक्षून चालणार नाही. याबरोबरीने खाणंपिणं हा सामाजिक आणि सांस्कृतिक अनुभवच आहे. आपण खाण्याचे मानकरी आहोत- आपण मनापासून खावं. आपण आपल्या खाण्याचा मनापासून आस्वाद घ्यावा. चांगल्या खाण्यापिण्याचे आपल्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतात हे लक्षात ठेवा.
 
Published By- Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती