Diabetes and heart disorders मधुमेहींमध्ये जवळजवळ निम्मे हृदयविकार कोणत्याही लक्षणांशिवाय आढळून येतात. म्हणून त्यास सायलेंट किलर असे संबोधले जाते. मधुमेहामुळे हृदयाच्या विविध समस्यांना आमंत्रण मिळते.बदलत्या जीवनशैलीमुळे 30-60 वयोगटातील व्यक्तींमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढते आहे. मधुमेहामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग (CVD), हृदयविकाराचा झटका तसेच हार्ट स्ट्रोकला साख्या समस्या उद्भवतात. अनियंत्रित मधुमेहामुळे हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो.
रक्तातील साखरेची पातळी सतत वाढल्याने संपूर्ण शरीरात रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या, धमन्या आणि नसांचे नुकसान होऊ शकते. रक्तातील उच्च साखरेची पातळीने रक्तवाहिन्यांच्या धमनींच्या भिंतींवर प्लेक तयार होतो. परिणामी रक्तवाहिन्या अरुंद होतात, ज्यामुळे रक्त पंप करण्यासाठी हृदयाला अधिक मेहनत घ्यावी लागते. ही स्थिती एथेरोस्क्लेरोसिस म्हणून ओळखली जाते आणि हार्ट फेल्युअरचा धोका वाढतो. रक्तातील उच्च साखरेची पातळी हृदयाला रक्त प्रवाह अडथळे आणते. त्यामुळे मधुमेह असलेल्यांनी त्यांच्या हृदयाच्या आरोग्याबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे. मधुमेहाचे व्यवस्थापन करणे आणि हृदय विकारांपासून दूर राहणे ही काळाची गरज आहे.
मधुमेहींनी हृदयाची काळजी कशी घ्यावी
नियमित तपासणी करा. रक्तदाब, रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉलच्या पातळीचे वेळोवेळी निरीक्षण करा. हृदयाशी संबंधित गुंतागुंत टाळण्यासाठी रक्तातील साखरेची पातळी शिफारस केलेल्या मर्यादेत राखणे आवश्यक आहे. मधुमेहींनी दररोज घरच्या घरी रक्तातील साखर आणि रक्तदाब तपासणे आणि डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळोवेळी घेणे योग्य राहिल. दररोज व्यायाम करा आणि वजन नियंत्रणात राखा. चालणे, जॉगिंग, पोहणे, वेट ट्रेनिंग किंवा एरोबिक्स यासारख्या व्यायामाची निवड करा. पौष्टिक आहाराचे सेवन करा. आपल्या आहारात ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश करावा. जंक फुड, प्रक्रिया केलेले पदार्थ, तेलकट आणि हवाबंद डब्यातील पदार्थांपासून दूर रहा. हृदय निरोगी ठेवण्यासाठी धूम्रपान आणि अल्कोहोलचे सेवन टाळा. आपल्या कुटुंबातल्या कुठल्याही व्यक्तीला मधुमेहाचा विकार जडला तर स्वत:ला त्यापासून दूर ठेवण्यासाठी वेळीच आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या.