सुपरहिट 'दे धक्का ' 2008 साली प्रदर्शित झाला होता. अतुल काळे आणि सुदेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शिन केले होते. मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर, संजय खापरे आणि सक्षम कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट महाराष्ट्रातील एका खेडेगावातील एका वेड्या कुटुंबाच्या ऑटो-रिक्षामधील प्रवासाविषयी होता.
कथा :
मकरंद जाधव (मकरंद अनासपुरे) नावाच्या खेड्यात राहणाऱ्या मोटार मेकॅनिक ने आपल्या लेकीला डान्स कॉम्पिटिशन मध्ये भाग घेता यावा म्हणून कोल्हापूर ते मुंबई केलेला असा सहकुटुंब सांगीतिक प्रवास. मकरंद च्या या कुटुंबात मकरंद चा दारुड्या बाप सूर्यभान जाधव (शिवाजी साटम), जिथे तिथे वस्तू चोरणारा क्लिप्टोमेनिया ग्रस्त मेव्हणा धनाजी (सिद्धार्थ जाधव), मकरंद ला संकट काळी साथ देणारी बायको सुमी (मेधा मांजरेकर), पहेलवान होण्यासाठी दिवसभर व्यायाम करणारा आणि अंडी खाणारा मुलगा किस्ना (सक्षम कुलकर्णी) आणि नृत्यात प्रावीण्य मिळवलेली मुलगी सायली (गौरी वैद्य) यांचा समावेश होता.
मुळात दे धक्का चे कथाकार महेश मांजरेकर यांनी ही पात्रे अफलातून लिहिली होती. या कुटुंबाचा मुंबई ते कोल्हापूर हा प्रवास रंजक करण्यात विशेष करून मकरंद आणि त्याचे वडील सूर्यभान यांच्यामधील तू-तू-मै-मै आणि धनाजी आणि मकरंद मधील विनोदी प्रसंग यांचा सिंहाचा वाटा होता. लॉजिकला बॅक सीटवर बसवून केवळ निखळ करमणूक करणारा हा धक्का आता नव्या रूपात आपला दुसरा भाग घेऊन आलाय.
दे धक्का २ मधील गाणी संगीतकार हितेश मोडक यांनी संगीतबद्ध केली आहेत तर गीतकार मंदार चोळकर आणि नेहा शितोळे हे आहेत.आघाडीचे गायक अवधूत गुप्ते, वैशाली माडे, शमिका भिडे, रिया भट्टाचार्य या चित्रपटाला लाभले आहे . सिनेमाचे संगीत 'व्हिडिओ पॅलेस' ने प्रदर्शित केले आहेत.
पात्र सर्व तीच आहेत. फक्त मकरंद ची मुलगी सायलीच्या भूमिकेत यावेळी महेश मांजरेकर यांची कन्या गौरी इंगवले हिची वर्णी लागली आहे. सुदेश मांजरेकर यांच्यासोबत अतुल काळे यांनी पहिल्या धक्क्याचे दिग्दर्शन केले होते. यावेळी मात्र सुदेश मांजरेकर सोबत स्वतः महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शनाची धुरा हातात घेतली आहे. कथा-पटकथा महेश यांचीच असल्याने कथेचा आत्मा म्हणजे या सर्व कुटुंबीयांचा एकत्रित प्रवास असाच ठेवण्याचा प्रयत्न महेश यांनी केलाय.