कलाकार : विक्रम गोखले, विनय आपटे, सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर, नीना कुलकर्णी, मिलिंद शिंदे, सविता माल्पेकर, विनोद, संस्कृती खेर.
भोंदूगिरी, अंधश्रद्धा, श्रद्धेचा बाजार या धर्तीवरचे ओ माय गॉड, देऊळ असे बरेच चित्रपट येऊन गेले आहेत. मनातील भीती दूर करण्यासाठी स्वामी आणि त्यांचे मल्टीनॅशनल लाईफ आदींचे शोध लागतात. मराठी सिनेमांचा दिग्दर्शक आणि रिअॅलिटी फिल्ममेकर गजेंद्र अहिरे यांचा हा सिनेमा आहे. त्यामुळे या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या, पण वेगळी कथा हाती असतानाही सिनेमात नेमकेपणा कमी आहे. कथेमध्ये अपेक्षित लय असती तर हा सिनेमा अधिक चांगला होऊ शकला असता.
या सिनेमात एका छोट्या गावात शून्यातून एक नवा 'स्वामी' जन्माला घातला जातो, त्यावेळी 'गाइड'ची आठवण येते. याला महात्मा बनवताना त्याच्याभवती नेमकी कोणती सिस्टिम काम करत असते, ती कशी काम करते आणि या सगळया प्रकरणाचा कार्पोरेट कंपन्या 'इव्हेंट' करून कसा फायदा कमावतात याचं चित्रण दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी सिनेमातून मांडलं आहे.
चित्रपटाची गोष्ट अशी की, सिद्धार्थ नामदेव हा एका अत्यंत छोट्या गावात.. गरिबीत राहणारा मुलगा. चळवळ्या. त्याला एका प्रोजेक्टसाठी पैसे उभे करायचेत. याकामी त्याला मदत करते ती त्याची प्रेयसी सायली. फंडिंगसाठी सिद्धार्थची भेट नचिकेतशी होते. यातून नचिकेतच्या मनात एक नवा डाव आकाराला येतो. सिद्धार्थला 'स्वामी' बनवून लोकांच्या श्रद्धेचा, भावनांचा व्यापा करण्याचे मनसुबे आखले जातात आणि टप्प्याटप्प्याने हा बाजार मांडला जातो.
सिद्धार्थ स्वामी कीर्तन करतात, हे केवळ नचिकेतसोबतच्या एका संवादात कळतं. या पटकथेत कुठेही काळाचं सूचन नाही. उदाहरणादाखल पाहा, एक सामान्य प्रियकर मोकळ्या हाताने रेल्वेने मुंबईतून थेट राजस्थानात जातो. तिथून तो आपल्या प्रेयसीला फोन करतो. तीही दुसऱ्या सेकंदात तिथे पोचते. ते दोघे तिकडे असल्याचा सुगावा तिसऱ्या सेकंदाला इकडच्या शत्रूपक्षाला लागतो. मग ते चौथ्या सेकंदाला मारेकरी धाडतात. तेही लगेच पोचतात. मग धावपळ.. हाणामारी.. पुढच्या क्षणात राजस्थनातला प्रियकर, प्रेयसी पुन्हा शत्रूपक्षाच्या दारात हजर! बरं, इकडे शत्रुपक्ष मारेकरी पाठवतानाही त्याच हॉलमध्ये असतात आणि हे प्रियकर-प्रेयसी परत आल्यावर ही सगळी मंडळी तिथेच बसलेली असतात. हं. आता याला कसं लावणार काळाचं लॉजिक? नुसती धावधाव. या सगळ्या प्रकारामुळे चांगल्या, संवेदनशील कलाकारांचा उत्तम अभिनय डोळ्यांसमोर 'वाया' जात असल्याचं दिसू लागतं.
पटकथेचा अभाव वगळता, सिनेमातले संवाद चोख आहेत बर का. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 'सिद्धार्थ स्वामी' (चिन्मय मांडलेकर) आणि नचिकेत (सुबोध भावे) यांची आमनेसामने जुगलबंदी पाहताना मजा येते. त्या संवादांना तर्काचा पाया आहे. म्हणजे 'स्वामी'ला मोठं करण्याचं क्रेडिट स्वतःकडे घेताना नचिकेत मांडत असलेले मुद्दे योग्य वाटत असतानाच, त्याला चोख उत्तर देणारा सिद्धार्थही अचूक वाटू लागतो. बऱ्याच महिन्यांनी सिद्धार्थच्या भूमिकेतून चिन्मय मांडलेकर यांचा आक्रमक अभिनय पाहायला मिळाला आहे. सुबोध भावे यांनीही कार्पोरेट जगतात मुरलेला मुरब्बी नचिकेत उत्तम साकारलाय. या दोघाना विक्रम गोखले, विनय आपटे यांच्यासारख्या दिग्गजांची खमकी साथ आहे. नीना कुलकर्णी यांची आज्जीही लक्षात रहाणारी. संस्कृती खेर हा नवा चेहरा या सिनेमातून दिसतो खरा. पण, तिचं नवं असणं सतत जाणवत रहातं. यातले काही प्रसंग निश्चित लक्षात रहातात. आजीने सिद्धार्थच्या मठात येणं.. आपण माणूस असल्याचं सिद्धार्थने सायलीला सांगणं हे प्रसंग उत्तम वठलेत.
सध्या ओपन एण्डेड सिनेमा हा ट्रेण्ड पुन्हा रुजू लागला आहे, पण ओपन एण्डेष सिनेमा म्हणजे 'गोंधळलेला शेवट' असा अर्थ अपेक्षित नाही. त्यामुळे 'स्वामीं'चा प्रत्यक्षात काहीच प्रभाव पडत नाही.