गलगले निघाले- चार आण्याची कोंबडी...

PRPR
भरत जाधव अभिनित आणि केदार शिंदे दिग्दर्शित गलगले निघाले हा चित्रपट म्हणजे चार आण्यांची कोंबडी आणि आठ आण्याचा मसाला. तो मसालाही बेचव. मनमोहन गलगले नावाच्या स्वतःशीच बोलणा-या पापभीरू माणसाचे कोळ्यांचं घराणं असलेल्या मुलीवर प्रेम बसते. हा कोळीवाडा म्हणजे स्मगलरांचा अड्डा असतो. एक खून होतो आणि पापभीरू गलगले त्यात अडकतो.त्याचा इन्सपेक्टर मित्र त्याला वाचवतो आणि शेवट गोड होतो. प्रयत्न करूनही कथा यापेक्षा जास्त वाढवता येणार नाही.

खुनात अडकलेला पापभीरू माणूस आणि त्यातून तो कसा बाहेर येतो, हा खरी कथा. स्वतःशी बोलण्याच्या लकबीचा तिच्याशी संबंध म्हणजे 'आत्याच्या दिराच्या मुलाचा मित्र'. लकबीची सुरूवातीची दृष्ये मजेशीर आहेत. त्यावरच पुढे तुफान हास्यस्फोटक प्रसंग निर्माण होतील, ही साधी अपेक्षा असते आणि पुढे पार विस्कटून जाते. पुढे लकब राहते पण तिचा खुनाशी, एकूणच पुढील चित्रपटाशी सुतराम संबंध नाही. गलगलेच्या जागी दुसरी कोणतीही साधी व्यक्तिरेखा चालली असती. शहरी दिसणा-या माणसाची व्यक्तिरेखा कोळ्यांच्या दुनियेशी सुसंगत नाही. विमा एजंट असलेल्या गलगलेची कथा शहरातच फिरवली असती तर जास्त हशे घेऊन गेली असती. शहरातच ती खूप फुलवता आली असती. केवळ त्याची नायिका मूळची कोळी असते आणि मुंबईत शिक्षणासाठी आलेली असते म्हणून केवळ हा उपद्व्याप. ती व्यक्तिरेखा वाट चुकलेल्या वासरासारखी भासते. 'जत्रा' आणि 'अगंबाई अरेच्चा' च्या पार्श्वभूमीवर चित्रपटाला गर्दी होते आणि पुढे गर्दीची निराशा होते. 'सही रे सही' या नाटकातील लकबच भरतला (परत परत परत) देऊन केदार शिंदेने फावल्या वेळात एक चित्रपट ‘पाडल’ आहे.

PRPR
केतकी थत्तेला दिलेली संधी ही जमेची बाजू आहे आणि तिने स्वतःच्या वाट्याला आलेल्या दृष्यांना आणि एका गीताला न्याय दिलेला आहे. सिध्दार्थ जाधवचं प्रयोजन कळत नाही. (कॉमिक व्हिलन हा प्रकार तो चांगला करू शकेल.) खरं तर भरत जाधव सोडून कोणाचंच प्रयोजन कळत नाही. रमेश देव यांना खलनायकाची भूमिका देऊन प्रेक्षकांना किंचित् धक्का दिला आहे. शाहीर विठ्ठल उमप यांना भूमिका का देण्यात आली असावी, हे कळले नाही तही दर्शन सुखावह आहे. त्यांचा वावर प्रसन्न आहे. केदार शिंदे नव्यांना संधी देण्याचे काम इमाने इतबारे आणि अत्यंत नेमाने करतो. याही चित्रपटात नवीन कलाकार आहेत. त्यांना पुढील चित्रपट मिळण्यास फायदा होईल. 'गौरी मांडवाखाली' या गाण्याचे चित्रीकरण दाक्षिणात्य ढंगाचे आहे. .खलनायकांची नावे ब्रह्मा, विष्णू , महेश आणि लंगडा बाळकृष्ण अशी आहेत. ही काही मौजेची ठिकाणं.

मंगेश कुलकर्णींने मात्र अतिशय उत्तम शाब्दिक विनोद असलेले संवाद लिहिले आहेत. ते ऐकण्यासाऱखे.अगदीच वेळ जात नसेल तर हा चित्रपट पाहावा.